केंद्र आणि राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे १२० कोटी नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित…

शेतकरी व लोकप्रतिनिधी १२ सप्टेंबर रोजी ओरोस कृषी कार्यालयासमोर छेडणार धरणे आंदोलन

आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांच्याशी चर्चा ; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याशीही संपर्क

सिंधुदुर्ग : आंबा व काजू पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने शेतकरी पिक विमा नुकसान भरपाई पासून वंचीत आहेत. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत माहिती दिली. गणेश चतुर्थी सण काही दिवसांवर आला असून त्याआधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळावी यासाठी तात्काळ यात लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी ना. मुंडे यांच्याकडे केली. या मागणीवर ना. मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तरीही या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसमवेत आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. १२ सप्टेंबर रोजी सकाळी १२ वा. ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आंबा व काजू पिक विम्याची प्रलंबित नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत आज आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांची जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राउत यांच्याशी चर्चा झाली. यावेळी त्यांनी पीक विम्याचा आढावा घेतला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांसाठी सन २०२२-२३ मध्ये ३८४६७ शेतकरी सहभागी झाले आहेत. १ डिसेंबरपासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे पर्यंत होता. शासन निर्णयानुसार पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्याने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे क्रमप्राप्त होते.मात्र पिक विमा योजनेत राज्य व केंद्र शासनाने आपल्या हिस्स्याचा विम्याचा हप्ता विमा कंपनीकडे वर्ग न केल्याने अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळालेली नाही.त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची सुमारे १२० कोटी रु रक्कम प्रलंबीत आहे. हि रक्कम शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळावी यासाठी हे आंदोलन छेडण्यात येणार आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक व सतीश सावंत यांनी दिली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3842

Leave a Reply

error: Content is protected !!