समुद्र किनारे आणि समुद्रातील जैवविविधता जपल्यास पर्यटनाचा शाश्वत विकास शक्य !
सागरी जैव विविधता तज्ञ डॉ. सुजीत कुमार डोंगरे यांचे प्रतिपादन
सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यटन सप्ताहाचा समारोप
कुणाल मांजरेकर
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अमाप जैव विविधता आहे. या जैव विविधतेचे रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे. अनेक सागर किनाऱ्यांवर कासव अंडी घालण्यासाठी येतात, त्यासाठी विविध रचना लागते, ती जिल्ह्यात उपलब्ध असलेले किनारे जपले पाहिजेत. सागरी किनारे आणि समुद्राच्या आत असणाऱ्या जलसंपदेचे संवर्धन केल्यास पर्यटन व्यवसाय अधिक भरभराटीस येईल आणि टिकून राहील, असे मत सागरी पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सुजित कुमार डोंगरे यांनी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या पर्यटन सप्ताहाच्या सांगता समारंभात बोलताना व्यक्त केले. आपल्या स्लाइड शो सादरीकरणामध्ये त्यांनी समुद्रातील पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल, याची सखोल माहिती दिली.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पर्यटन सप्ताहाचा सांगता समारंभ ऑनलाईन आणि ऑफलाईन अश्या संयुक्त पद्धतीने आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी डॉ. डोंगरे यांनी गुगल मीट वरून उपस्थित प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. एच. एम. चौगले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करून, प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर यांनी पर्यटन सप्ताहाच्या अभिनव कल्पनेबद्दल सर्वांचे अभिनंदन करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. २७ सप्टेंबर पासून ३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेतलेल्या सर्व उपक्रमांचा आढावा प्रा. खोबरे, प्रा. चौगले, प्रा. राबते, प्रा. खोत, प्रा. नाईक, प्रा. पवार यांनी घेतला. प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत यांनी हा अभिनव उपक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले. तसेच मालवण नगरपरिषदेने देखील मालवण मधील पर्यटनाच्या वाढीसाठी सागर किनारे सातत्याने स्वच्छ करण्याची सूचना केली. यापुढे देखील हा पर्यटन सप्ताह नवनवीन कल्पनांनी आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच समाजातील सर्व घटक यांना उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने उपयुक्त व्हावा अशा तऱ्हेने साजरा करण्यात यावा असे प्रतिपादन केले. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सचिव आणि नगरसेवक चंद्रशेखर कुशे यांनी या पर्यटन सप्ताहातून निदर्शनास आलेल्या सर्व सूचना नगरपरिषदेस द्याव्यात, आम्ही त्यावर निश्चितपणे कार्यवाही करू, असे आश्वासन दिले. महाविद्यालयामध्ये पर्यटनावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्याच्या दृष्टीने देखील विचार केला जाईल असे मत मांडले. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सदस्य डॉ. शशिकांत झांटये यांनी मालवण मधील पर्यटनासाठी कोणकोणत्या बाबी सुधारल्या पाहिजेत, त्यामध्ये महाविद्यालयाची भूमिका काय असावी इत्यादी विषयावर जगभरातील अनेक देशातील उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील प्राध्यापक एच. एम. चौगले यांच्या सामाजिक कार्याबद्दल यशवंत प्रतिष्ठानकडून शांतता प्रेरणा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल डॉ. झांट्ये यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना प्राध्यापक चौगले यांनी आपले सामाजिक कार्य असेच चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.