नाकर्तेपणा झाकण्यासाठीच नगराध्यक्षांकडून फायर बॉल खरेदी !
उपनगराध्यक्ष राजन वराडकर, भाजप गटनेते गणेश कुशे यांचा आरोप
मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार तुमच्या पक्षाचे असूनही दोन वर्षात अग्निशमन वाहन का नाही आले ?
कुणाल मांजरेकर
मालवण : नगरपरिषदेतील अग्निशमन वाहन नवीन खरेदीसाठी जुने वाहन निर्लेखीत करून दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार हे सगळेच नगराध्यक्षांच्या पक्षाचे आहेत. मग दोन वर्षे आपले वजन वापरून एक अग्निशमन वाहन आणू शकले नाहीत. हे त्यांचे अपयश असून अजून किती काळ नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार ? असा सवाल उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि भाजप गटनेते गणेश कुशे यांनी पत्रकार परिषदेत केला. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठीच फायर बॉल खरेदी केल्याचे ते मोठेपणाने सांगत असल्याची टीका त्यांनी केली.
उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि गणेश कुशे यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांना लक्ष्य केले. नगराध्यक्ष दोन वर्षात अग्निशमन वाहन आणू शकले नाहीत. अजून किती काळ वाट पहायची ? हेच का तुमचे शासन दरबारी वजन ? महेश कांदळगावकर हे प्रशासनाचा गाडा अभ्यास असलेले २० वर्षे अधिकारी होते. मात्र, त्यांच्या या अभ्यासाचा कोणताही फायदा शहराला तेव्हाही झाला नाही आणि आताही झाला नाही. विकास तर खूपच दूर राहीला. मोठ्या आशेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपण्यास दोन महिने शिल्लक राहिले. सर्व मूलभूत प्रश्न जैसे थे. कचरा, स्ट्रीट लाईट, भटके कुत्रे, गुरे, ना मच्छरमुक्त शहर सर्वच प्रश्न जैसे थे. तीन वर्षांपूर्वी कचरा उचलण्यासाठी पाच नवीन घंटागाड्या खरेदी, ढकलगाड्या खरेदी केल्या. आवश्यक कर्मचारी घेतले. स्वच्छता अभियान राबविले. तत्कालीन मुख्याधिकारी रंजना गगे यांनी त्यासाठी मेहनत घेतली. डम्पिंग ग्राऊंग मैदानासारखे स्वच्छ केले हे सर्व काही काळ चालले. हे सर्व पुढे का टिकू शकले नाही ? नव्याने खरेदी केलेल्या सक्शन वाहनाची अवस्था काय ? मैला टाकण्यासाठी बांधलेली टाकी भरलेली असते. अनेकवेळा वाहन उभेच. एवढे पैसे खर्च करून वाहन उभेच राहणार असेल तर पैसे खर्च करणे हाच उद्देश होता का ? आमदारांच्या हस्ते उदघाटन झालेल्या कचरा विलगिकरण प्रकल्पाचे काय झाले ? त्यासाठी आणलेली मशीन आणि कचराही तिथेच. त्याठिकाणी अनेकवेळा आग लागली की लावली ? असा सवाल राजन वराडकर यांनी उपस्थित केला.
फक्त या कारणासाठीच नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांचे एकमत ; गणेश कुशेंचा टोला
शहरातल्या समस्यांबाबत विचारले असता नगराध्यक्ष सांगतात मुख्याधिकारी ऐकत नाही. आणि मुख्याधिकारी सांगतात नगराध्यक्ष ऐकत नाही. या दोघांचे फक्त बिलं काढण्यासाठी एकमत होते असा टोला गटनेते गणेश कुशे यांनी लगावला आहे. ही परिस्थिती न बदलल्यास पुढची पत्रकार परिषद डम्पिंग ग्राऊंडवर घेऊन त्याठिकाणी पर्दाफाश करणार असल्याचा इशारा गणेश कुशे यांनी दिला आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी दोन कोटी रुपये खर्च झाले. त्यातून निष्पन्न काही नाही. पैसे खर्च करणे हाच यांचा उद्देश आहे. जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. एकही मागणी पूर्ण होत नाही. या सर्व प्रकाराची नगराध्यक्षांनी जबाबदारी घ्यावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा कुशे यांनी दिला आहे.