मालवण शहरातील भाजी मंडईचे काम “सीआरझेड” मुळे रखडले ; आ. वैभव नाईकांकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती…

पालिकेच्या सल्लागाराकडून निष्काळजीपणा ; संबधितावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

मालवण : शहरातील भाजी मंडईच्या इमारतीचे काम सीआरझेडच्या समस्येमुळे रखडले असून यात वरिष्ठ पातळीवर आवश्यक पाठपुरावा न झाल्याने आमदार वैभव नाईक यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना आज चांगलेच खडसावले. पालिकेच्या सल्लागाराकडूनही निष्काळजीपणा झाला असल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे आमदार नाईक यांनी स्पष्ट केले.

मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांनी शहरातील विविध समस्या तसेच कामांचा आढावा घेण्यासाठी येथील पालिकेस भेट दिली. यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे, मंदार केणी, बाबी जोगी, भाई कासवकर, तपस्वी मयेकर, दीपा शिंदे, महेश जावकर, सन्मेष परब, नरेश हुले, महेंद्र म्हाडगुत, सुर्वी लोणे, सुहास वालावलकर, सिद्धार्थ जाधव, हेमंत मोंडकर यांच्यासह पालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी शहरातील भाजी मंडईच्या नूतन इमारतीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. यात सीआरझेडच्या परवानगीबाबत संबंधित समितीकडे पालिकेकडून जो पाठपुरावा करणे आवश्यक होते तो न झाल्याने हे काम रखडले आहे असे सांगत संबंधित अधिकाऱ्यांना आमदार नाईक यांनी खडसावले. पालिकेच्या सल्लागाराचा निष्काळजीपणाही याला जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी झालेल्या चर्चेत बांधकामच्या अधिकाऱ्यांनी सीआरझेडच्या समितीकडून पालिकेस ऑफलाईन प्रस्तावाऐवजी पुन्हा नव्याने ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे स्पष्ट केले. बांगीवाडा येथील प्रेमगल्ली येथील पाणंदीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत हे काम चांगले होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या. त्याचबरोबर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे काम रखडले असून संबंधित संस्थेस नोटीस बजावण्यात यावी. याप्रश्नी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील अनेक भागातील पथदिवे बंदावस्थेत असून ते सुरू करण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या याचा आढावा घेण्यात आला. यावेळी पथदिव्यांची दुरुस्ती तसेच नवीन दिवे बसविण्यासाठी निविदा काढत ठेका देण्यात आला आहे. त्यानुसार कालपासून शहरात कामास सुरवातही करण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी संपूर्ण शहर पथदिव्यांनी उजळून निघणार आहे असे स्पष्ट करण्यात आले. याशिवाय रस्त्यांवरील खड्डे तसेच शेवाळामुळे ज्या पाणंदी धोकादायक बनल्या आहेत त्यावर ब्लिचिंग पावडर टाकण्याची कार्यवाही तत्काळ करण्याची सूचना आमदार नाईक यांनी दिली. त्यानुसार येत्या आठ दिवसात याची कार्यवाही केली जाणार असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!