भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या तत्परतेचा पुन्हा प्रत्यय…
काळबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती ; नागरिकांना चिखलातून काढावा लागत होता मार्ग
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या तत्परतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. शहरातील मेढा येथील श्री काळबादेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली होती. काळबादेवी मंदिराच्या उद्या होणाऱ्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर दीपक पाटकर यांनी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर तातडीने हा रस्ता पालिकेच्या वतीने दुरुस्त करण्यात आला आहे. याबद्दल स्थानिक नागरिकांनी पालिका प्रशासन आणि माजी नगरसेवक दीपक पाटकर यांचे आभार मानले आहेत.
श्रावण महिन्यात होणारा मेढा येथील काळबादेवी मंदिराचा जत्रोत्सव उद्या (मंगळवारी) संपन्न होत आहे. याठिकाणचा रस्ता खड्डेमय झाल्याने येथील नागरिकांना चिखलातून वाट काढत जावे लागत होते. उद्या होणाऱ्या जत्रेच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा, यासाठी येथील बाबु धुरी, किशोर जोशी यांसह धुरी कुटुंबियांनी दीपक पाटकर यांचे येथे लक्ष वेधले होते. याबद्दल श्री. पाटकर यांनी पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे, अवेक्षक सुधाकर पाटकर, बांधकाम विभागाच्या अधिकारी सोनाली हळदणकर यांच्याकडे पाठपुरावा करून हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा, अशी मागणी केली. याबाबत श्री. पाटकर यांच्या पाठपुराव्यानंतर पालिकेच्या वतीने हे काम तातडीने मार्गी लावण्यात आले आहे. या कामासाठी संदीप मालंडकर, कमलेश कोचरेकर यांनीही सहकार्य केले. हे काम मार्गी लागल्याबद्दल नागरिकांनी दीपक पाटकर आणि पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.