कणकवलीत आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली एकवटला मराठा समाज ; निषेध मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

जालन्यातील मराठा आंदोलकांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ कणकवलीत मोर्चा ; शेकडो मराठा बांधव मोर्चात झाले सहभागी

कणकवली : जालना येथे मराठा समाजाच्या उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजबांधवांनी भव्य मोर्चाकाढून या घटनेचा जाहीरपणे निषेध करत आपला आक्रोश व्यक्त केला. कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पटवर्धन चौकातून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत सरकार विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा काढण्यात आला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. “लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय!”, “लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा निषेध असो!”, “एक मराठा लाख मराठा! जय भवानी जय शिवाजी!”, “तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय!”, अशा गगनभेदी घोषणा देऊन मराठ्यांनी कणकवली शहर परिसर दणाणून सोडला.

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, गेली सात ते आठ वर्षे मराठा बांधव शांततेत आंदोलन करत आहेत. परंतु अद्याप पर्यंत या आंदोलनाला गालबोट लागले नव्हते. जालना येथे सरकराने मराठा बांधवांवर अमानुष लाठी हल्ला करून लोकांची डोकी फोडून हे आंदोलन भडकवले आहे. या मराठा बांधवांच्या आम्ही पाठिशी आहोत. त्यासाठी आम्ही हे आंदोलन केले आहे. याआधी जी जी सरकारे होती त्यांच्या विरोधात अनेक आंदोलने मराठा समाजाने केली. त्या सर्व आंदोलनात आम्ही सहभागी झालो. मात्र सरकारच्या विरोधात मराठे एकवटू नये मोर्चाला येऊ नयेत यासाठी काही जणांनी मराठ्यांमध्ये फूट पाडली आहे. त्याचाही आम्ही निषेध करतो. मराठा बांधवांवर लाठी चार्ज करणाऱ्या दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. मराठा समाज बांधवांवर केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्ष नेते असताना सत्तेत आल्यानंतर तीन महिन्यात आरक्षण मिळवून देऊ असे आश्वासित केले होते. मात्र आता ते सत्तेत येऊन दिड वर्ष झाले तरी आरक्षण मिळाले नसल्याची आठवण आ.वैभव नाईक यांनी करून दिली.

सतीश सावंत म्हणाले, मराठा बांधवांवर सरकार करवी हा लाठीहल्ला करण्यात आला. याचा निषेध राज्याच्या कानाकोपऱ्यातून करण्यात आला. मराठा समाजाचे जवळपास ५७ मोर्चे आजपर्यंत झाले. परंतु तेव्हाच्या सरकारने कधीही लाठी हल्ला केलेला नाही. जालना मधील उपोषण दडपण्यासाठी सरकारने लाठीमार केला. त्यामुळे याची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. परंतु ते देणार नाही त्यांना सत्ता महत्त्वाची आहे. काहींनी राजकीय दबाव असल्यामुळे आपण मोर्चाला उपस्थित राहू शकत नाही असे फोन करून सांगितले. परंतु पक्षभेद बाजूला ठेवून आपल्याला समाजासाठी तीव्र आंदोलन करण्याची गरज आहे. सरकारच्या बचावासाठी काही जणांच्या या मोर्चाला छुपा विरोध होता. त्या लोकांना केवळ निवडणूकीत मतदानासाठी मराठे हवे आहेत असा घणाघात सतीश सावंत यांनी केला. यावेळी जान्हवी सावंत, नीलम पालव यांनी या लाठीहल्ल्याचा निषेध व्यक्त करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.तसेच सरकारच्या निर्दयी वागणुकीला जनताच उत्तर देईल असे सांगितले.

या मोर्चात आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, युवानेते संदेश पारकर, इर्शाद शेख, मराठा समाज बांधव संजय पडते, सुशांत नाईक, मंदार शिरसाट, बाळा गावडे, राजू शेट्ये, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नीलम सावंत पालव, जान्हवी सावंत, रुची राऊत, वैद्यही गुडेकर, दुर्वा शिंदे, माधवी दळवी, प्रमोद मसुरकर,आबु पटेल, संजना कोलते,राजू रावराणे, रामू विखाळे,योगेश सावंत,राजू राठोड,मंगेश सावंत,निसार शेख,रुपेश आमडोस्कर,हर्षद गावडे,अनुप वारंग,नितेश भोगले, सचिन आचरेकर,नितीन सरंगले,संकेत नाईक,सचिन आमडोस्कर,बाबू जाधव,ललित घाडीगावकर, प्रा.मंदार सावंत,सिद्धेश राणे, वैभव मालंडकर, बेनी डिसोजा,शीतल सावंत, सिद्धी राणे, बाबा सावंत,सोमा घाडिगावकर ,सचिन राणे आदींसह जिल्ह्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!