निलेश राणेंच्या कुडाळ – मालवण मधील उमेदवारीवर पालकमंत्र्यांचे “शिक्कामोर्तब” !

विकासाची तळमळ असणाऱ्या निलेश राणेंना साथ द्या ; अणाव घाटचे पेड पुलाच्या लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे ग्रामस्थांना आवाहन

कुडाळ : कुडाळ मालवण मतदार संघात भाजपाकडून माजी खासदार निलेश राणे यांच्या उमेदवारीची मागणी कार्यकर्त्यांकडून होत असताना कोकणातील भाजपचे बडे नेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत मोठे विधान केले आहे. विकासाची तळमळ असणाऱ्या नेत्याला साथ देण्याची आपली जबाबदारी असते. या मतदार संघामध्ये यापुढे माजी खासदार निलेश राणे हे आमदार म्हणून उभे राहणार आहेत आणि तुम्ही त्यांना साथ द्या. त्यांच्यामध्ये काम करण्याची जी तळमळ आहे, पाठपुरावा करण्याची धावपळ आहे, ती या ठिकाणच्या आमदारांमध्ये नाही असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

कुडाळ तालुक्यातील अणाव घाटचे पेड या पुलाची उंची वाढवणे या विकास कामाचा लोकार्पण सोहळा सोमवारी संपन्न झाला. या पुलाचे लोकार्पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, अणाव सरपंच लिलाधर अणावकर, उपसरपंच अदिती अणावकर, युवानेते विशाल परब, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, जेष्ठ पदाधिकारी राजू राऊळ, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, विनायक अणावकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, अधीक्षक अभियंता छाया नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण प्रधानसेवक म्हणून काम करणार असल्याची शपथ घेतली. अशाच प्रकारे आपण लोकप्रतिनिधी काम केले पाहिजे असे सांगून या पुलाचे काम महाविकास आघाडीमुळे रखडले होते. नाबार्ड मधून मंजूर झालेले हे काम त्या सरकारने रखडून ठेवले. आवश्यक असलेला निधी त्याला दिला नाही. शिंदे फडणवीस सरकार आल्यावर आवश्यक असलेला निधी दिला आणि त्यामुळे हे पुल आता पूर्णत्वास जाऊ शकले असे त्यांनी सांगितले.

२०१४ नंतर खरा विकास आता दिसतोय

यावेळी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांनी सांगितले की २०१४ नंतर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विकासाची गंगा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आता दिसून येत आहे. या पुलाचे रखडलेले काम मार्गी लागले आहे. भाजप पक्षामध्ये जे ग्रामस्थ प्रवेश होत आहेत हे कामाच्या प्रभावावर. आम्ही काही पैसे देत नाही, तर शाश्वत विकासाचा विश्वास देत आहोत. म्हणून ही लोक आमच्या जवळ येत आहेत. यापुढे या मतदारसंघाचा विकास टप्प्याटप्प्याने आम्ही करणार आहोत असे निलेश राणे यांनी सांगून वेगवान पद्धतीने काम करणारे पालकमंत्री आपल्याला भेटलेले आहेत. गणेश चतुर्थी पूर्वी महामार्गाचा एक मार्ग पूर्ण करण्यासाठी ते धडपड करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

जमीन मालकांचे करण्यात आले सत्कार

यावेळी बाळकृष्ण पालव, अशोक पालव, मधुकर परब, गोपाळ पालव, योगेंद्र पालव, साबाजी पालव, दिलीप पालव, सचिन पालव, लक्ष्मण पालव, हरिश्चंद्र परब, नरेश परब या जमीन मालकांचे सत्कार यावेळी करण्यात आले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!