मालवणात भाजपचा “बडा धमाका” ; ठाकरे गटाच्या छोटू ठाकूरांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५०० ग्रामस्थ भाजपात !

भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मसुरे डांगमोडे गावात रंगला भव्य प्रवेश सोहळा

नऊ वर्षात विकासाचे एकही काम आमदार वैभव नाईकांकडून मार्गी न लागल्याने भाजपात दाखल होत असल्याची ग्रामस्थांची माहिती

नशिबात असेल तर मी आमदार होईन, पण २०१४ पासून दिशाहीन बनलेल्या कुडाळ – मालवणला दिशा देण्याचा माझा प्रयत्न : निलेश राणे

निलेश राणे आणि मी एकत्रच ; आमच्याबाबत जेवढ्या अफवा पसरवाल, तेवढे पेटून उठून तुमची लंका जाळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : दत्ता सामंत यांचा विरोधकांना इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मालवणात मोठा धमाका केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी पं. स. सदस्य संजय उर्फ छोटू ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५०० ग्रामस्थानी रविवारी सायंकाळी भाजपा नेते निलेश राणे आणि प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. नऊ वर्षात आमच्या गावाचे विकासाचे प्रश्न सोडवण्यात आमदार वैभव नाईक अपयशी ठरले आहेत. त्यामुळे गावचा विकास व्हावा, ही एकमेव मागणी घेऊन आम्ही सर्व ग्रामस्थ भाजपात प्रवेश करीत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मी आमदार होईन की नाही, हा नशिबाचा भाग आहे. मात्र २०१४ पासून दिशाहीन बनलेल्या कुडाळ मालवण मतदार संघाला दिशा देण्याचा माझा प्रयत्न आहे. जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत या मातीसाठी काम करीत राहणार, असे निलेश राणे यांनी सांगितले. तर निलेश राणे आणि मी एकत्रच आहोत. मात्र काहीजण नाहक आमच्या बाबत अफवा पसरवत आहेत. आमच्या नात्यात विष कालवण्याचा जेवढा प्रयत्न कराल, तेवढे आम्ही पेटून उठू आणि तुमची लंका जाळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दत्ता सामंत यांनी विरोधकांना दिला.

माजी पं. स. सदस्य संजय उर्फ छोटू ठाकूर यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता. मात्र ठाकरे गटात जाऊनही विकास कामांची अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांनी “घरवापसी” केली आहे. भाजपा नेते दत्ता सामंत यांच्या शिष्टाईनंतर माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन त्यांनी रविवारी डांगमोडे गावात सुमारे ५०० ग्रामस्थांसह भाजपात प्रवेश केला. यामध्ये माजी पं. स. सदस्या सौ. गायत्री ठाकूर, नवतरुण मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, मर्डे ग्रा. पं. सदस्य पूजा ठाकूर, गार्गी चव्हाण, रमाकांत सावंत, जगदीश चव्हाण, सचिन पाटकर, आंगणेवाडी शाखाप्रमुख संजय आंगणे, बांदिवडे युवासेना शाखाप्रमुख शशांक परब, बूथप्रमुख सचिन आंगणे, संजय आंगणे, बेलाचीवाडी येथील प्रकाश घाडीगावकर, सुनील घाडीगावकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांचा समावेश होता. या सर्वांचे भाजपा नेते निलेश राणे, दत्ता सामंत आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बाळा गोसावी, बाळू कुबल, विजय केनवडेकर, सरोज परब, अनिल कांदळकर, महेश बागवे, महेश मांजरेकर, वेरली सरपंच धनंजय परब, बिळवस सरपंच मानसी पालव, महान सरपंच अक्षय तावडे, मालडी सरपंच पूर्वा फणसगावकर, वडाचापाट सरपंच सोनिया प्रभुदेसाई, सुनील घाडीगावकर, मकरंद राणे, अनिल न्हिवेकर, राजा गावडे, संतोष साटविलकर, सुधीर साळसकर, सूर्यकांत फणसेकर, दादा साईल, रुपेश कानडे, राजू बिडये, सुशांत घाडीगावकर, राजेंद्र प्रभुदेसाई, दयानंद देसाई, मिहीर राणे, दादा नाईक, दिलीप बिरमोळे, निलेश खोत,शेखर पेणकर, प्रशांत परब, स्वप्नील गावडे, महेंद्र चव्हाण, लक्ष्मी पेडणेकर, नवलराज काळे, महेश सारंग, ललित चव्हाण, मोहन वराडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निलेश राणे म्हणाले, नऊ वर्ष या भागाचा विकास रखडला आहे. ही कामे येत्या वर्षभरात पूर्ण करून घेण्याची जबाबदारी माझी आहे. २०१४ पर्यंत राणे साहेब पालकमंत्री होते, तेव्हा विकासाचा निधी मोठ्या प्रमाणात येत होता, तो त्यानंतर अचानक कसा थांबला ? राणे साहेब असताना अधिकाऱ्यांवर त्यांचा आदरयुक्त दबाव होता. राणे साहेबांच्या जिल्ह्याला निधी दिला नाही तर राणे साहेब आपल्याला मंत्रालयात बसू देतील का ? अशी भीती अधिकाऱ्यांना होती. ती भीती आता नाहीशी झाली. विरोधकांनी राणे साहेबांवर टीका करताना त्यांच्याशी विकास कामावर स्पर्धा करावी. हा मतदार संघ ९ वर्ष विकास कामांसाठी झुंजतो आहे. विकास कामाअभावी मतदार संघ ओस पडला आहे. येथील ट्रान्सफॉर्मर साठी अडीच लाखाचा निधी आमदार आणू शकत नाही. पण। आमचे दत्ता सामंत स्वतःच्या खिशातून देऊ शकतात. देणाऱ्याची झोळी तशी लागते. पण समोरच्यांचा तुमच्याच झोळीवर लक्ष असेल तर तो तुम्हाला देणार कुठून ?

…. म्हणून मी कुडाळ – मालवणात सक्रिय !

ज्या माणसाने माझ्या वडिलांचा पराभव करून जी लाल रेषा माझ्या आयुष्यात ओढली, ती लाल रेषा कायमस्वरूपी पुसून काढण्यासाठी मी या मतदार संघात सक्रिय आहे. आम्ही ग्रामस्थांना जी आश्वासनांची पत्रे देतो, ती कागदपत्रे नाही, शपथपत्रे असतात. शब्द देऊन कामे केली नाहीत, तर राणेंची औलाद म्हणवून घेणार नाही, असे निलेश राणे म्हणाले. २०१४ नंतर येथे विकासासाठी निधी आला नाही. २०२४ चा निकाल निलेश राणे साठी नाही, तर तुमच्यासाठी महत्वाचा आहे. राणेनी आजपर्यंत आयुष्यात ठेकेदारी केली नाही. आता मला महाराष्ट्रात कुडाळ मालवणला पुन्हा एकदा ओळख निर्माण करून द्यायची आहे, त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, असे ते म्हणाले.

नऊ वर्षात कुडाळ मालवण अधोगतीकडे : दत्ता सामंत

२०१४ पासून नऊ वर्ष हा कुडाळ मालवण मतदार संघ अधोगतीकडे गेला आहे. फक्त भावनिक भांडवल करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचे काम विरोधकांनी केले. राणे साहेबानी जन्माला घातलेल्या कामांचे बारसे करण्या व्यतिरिक्त एकही नवीन काम विरोधकांनी २०१४ नंतर आणले नाही. केवळ खोटी बदनामी करून राणे साहेबांचा पराभव केला. आता निलेश राणे ह्या मतदार संघात सक्रिय झाले आहेत. ते हुशार आणि उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे या मतदार संघाला त्यांची गरज आहे, असे दत्ता सामंत म्हणाले.

राणेसाहेबांची साथ सोडू नकोस : जयवंत परब यांचीच सूचना

राणेसाहेबांप्रमाणेच मसुरे गावचे सुपुत्र जयवंत परब हे माझे गुरु. राणेसाहेबां पासून ते दूर झाल्यानंतर मी परब साहेबाना भेटलो होतो. त्यावेळी स्वतः परब साहेबानी मला राणेसाहेबांची साथ सोडू नको अशी सूचना केली होती. हे मी भरतेश्वराची शपथ घेऊन सांगतो. राणे साहेब आणि परब साहेबांची फार घनिष्ठ मैत्री होती. आज काहीजण परब साहेबांचे नाव घेऊन गावात राजकारण करीत असल्याबाबत दत्ता सामंत यांनी नाराजी व्यक्त केली.

छोटू ठाकूर यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पैसे घेऊन किंवा अन्य आमिष घेऊन प्रवेश केल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. पण भरतेश्वर आणि भराडी देवीची शपथ घेऊन सांगतो. छोटू ठाकूर यांनी एकही पैसा मागितला नाही. फक्त गावाचा विकास करा, अशी एकच अपेक्षा धरली. त्यांच्या मुलाला जिल्हा बँकेत नोकरी देण्यासाठी पत्र आजही तयार आहे. पण मला नोकरी नको. माझ्या मुलाच्या करिअर साठी मी प्रवेश केला, अशी ओरड होता नये. अशी ठाम भूमिका छोटू ठाकूर यांनी घेतली आहे. अशा चांगल्या कार्यकर्त्याला बदनाम करू नका. तुम्ही त्यांना दिलेला विकासाचा शब्द पाळला असता तर त्यांना दुसरीकडे जायची गरज भासली नसती. दहा वर्ष आमदार, खासदार असूनही तुम्ही जनतेचे प्रश्न सोडवू शकत नाही. अशांना आता जनताच घरी बसवणार असून २०२४ मध्ये निलेश राणे यांना महाराष्ट्रात आगळे वेगळे मताधिक्य मिळवून देणार असे दत्ता सामंत यांनी सांगून पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे ही एकाच रथाची दोन चाके आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे प्रश्न सोडवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश ठाकूर यांनी करताना या प्रवेशामागील भावना स्पष्ट केली. मागील चार वर्ष आम्ही शासनाकडे आमच्या मागण्यांचा पाठपुरावा केला. पण एकही काम झालं नाही, ही कामे पूर्णत्वास जावीत म्हणून आम्ही ग्रामस्थांनी छोटू ठाकूर यांना भाजपात येण्यास तयार केले. आज संपूर्ण गाव एकदिलाने भाजपात प्रवेश करीत आहोत. आमचे रस्ते आणि विकासाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन राजा सामंत यांनी केले तर तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!