कै. विलास गावडे यांच्या स्मृती दिनानिमित्त वृद्धांना अन्नदान !
उद्योजक प्रीतम गावडे यांची वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त सामाजिक बांधिलकी
मालवण | कुणाल मांजरेकर
मनसेचे युवा नेते तथा सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक प्रीतम विलास गावडे यांची सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा दिसून आली आहे. प्रीतम यांचे वडील चौके पंचक्रोशीतील नावाजलेले व्यक्तिमत्व दिवंगत विलास गावडे यांच्या सातव्या स्मृती दिनानिमित्त प्रीतम यांनी पणदूर येथील आनंदाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांना अन्नदान केले. तसेच आश्रमाच्या बांधकामासाठी ५०० दगड मदत म्हणून सुपूर्द केले.
उद्योजक प्रीतम गावडे हे सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहेत. गरजू व्यक्तींना मदत करण्यात त्यांचा पुढाकार असतो. त्यांचे वडील कै. विलास गावडे हे देखील चौके पंचक्रोशीत आपल्या दातृत्वासाठी प्रसिद्ध होते. सात वर्षांपूर्वी त्यांचे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांचा सामाजिक सेवेचा वसा त्यांचे सुपुत्र प्रीतम गावडे यांनी जोपासला आहे.
कै. विलास गावडे यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रीतम यांनी आपल्या आई आणि मित्रपरिवारासह आनंदाश्रयला भेट देऊन वृद्ध निराधारांसह वडिलांच्या स्मृतींना उजाळा दिला.