कोकणात “सीआरझेड” बाधितांना दिलासा ; घरबांधणीसाठी नगरपालिका आणि स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी मिळणार
३०० चौ. मी. नवीन बांधकामांना मिळणार परवानगी : सिव्हिल इंजिनिअर अमित इब्रामपूरकर यांची माहिती
मालवण : गेली बारा वर्षे सिंधुदुर्ग सह पाच जिल्ह्यातील नागरिक CRZ (सागरी किनारपट्टी नियमन क्षेत्र) कायद्यामुळे त्रस्त होते. मालवण शहरातही नव्याने घराचे बांधकाम करताना नगरपालिका प्रशासना कडून बांधकाम परवानगी मिळत नव्हती. मात्र केंद्र शासनाने मुंबई वगळता अन्य पाच सागरी जिल्ह्याकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे नगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने घराच्या बांधकामांना आता पालिका प्रशासनाकडून परवानगी मिळणार आहे. शहरात ३०० चौ. मीटर बांधकामांना आता पालिकेकडून परवानगी मिळणार आहे, अशी माहिती सिव्हिल इंजिनिअर अमित इब्रामपूरकर यांनी दिली आहे.
मालवण शहरात आतापर्यंत नवीन बांधकाम केल्यावर नगरपालिका प्रशासनाकडून घरपत्रक उताऱ्यावर अनधिकृत बांधकाम असा लाल शेरा मारला जात होता. परंतु आता नगरपालिका प्रशासन मंजूर सुधारित विकास आराखड्यानुसार ३०० चौरस मीटर पर्यंत इमारत बांधकाम प्रस्तावित असेल तर नगरपालिकेकडून किंवा तत्सम प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी मिळू शकते. अशा प्रकारचे नोटिफिकेशन केंद्र शासनाच्या वतीने व राज्य शासनाच्या शिफारशीमुळे मंजूर झाले असल्यामुळे शहरातील लोकांना लाभ मिळणार आहे. ही आनंदाची बाब असल्याचे सिव्हिल इंजिनियर अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले असून केंद्र आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.