कुडाळ – मालवणात ठाकरे गटाला हादरा बसणार ; गणेश चतुर्थीपूर्वी निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपात १० ते १२ मोठे प्रवेश

दत्ता सामंत यांची माहिती ; ठाकरे गटाच्या घागरीला दगड बसलाय, आता किती लिकेज होईल, सांगणे कठीण …

संभाव्य फुटीमुळे आ. वैभव नाईक सैरभैर ; फुट टाळण्यासाठीच मालवणात सरपंचांची बैठक घेऊन केली विनवणी

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ, मालवण तालुक्यात गणेश चतुर्थी पूर्वी ठाकरे गटाला मोठा हादरा बसणार आहे. किमान १० ते १२ मोठे प्रवेश भाजपात होणार असून यामुळे आमदार वैभव नाईक सैरभैर झाले आहेत. ही फुट टाळण्यासाठी मालवणात काल त्यांनी सरपंचांची बैठक घेऊन त्यांना पक्ष सोडून न जाण्यासाठी विनवणी केली. तुमचे जे प्रश्न शिल्लक आहेत, ते मी सोडवतो, अशी विनवणी त्यांनी केली. मात्र आता घागरीला दगड बसला आहे. त्यामुळे आता किती लिकेज होईल, हे सांगणे कठीण आहे, असा टोला भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत यांनी लगावला आहे. मालवण मधील भाजपा कार्यालयात ते बोलत होते.

ते म्हणाले, ठाकरे गट फुटणार हे कळून चुकल्याने आ. वैभव नाईक सगळीकडे बैठका घेत आहेत. पण ते ही फुट टाळू शकत नाहीत. कुडाळ, मालवण मतदार संघात आता परिवर्तन अटळ आहे. मागील लोकसभा निवडणुकीत आपल्याकडे कोणताही पक्ष नसताना माजी खा. निलेश राणे यांना पावणे तीन लाख मते मिळाली. त्यावेळी मालवण तालुक्यात २८०० मतांचे लीड होते. तेव्हा मोदींचे नाव, भाजपा पक्ष संघटना आपल्या सोबत नव्हती. आता आपण सर्वजण भाजपात आहोत. केंद्रात आणि राज्यात आपली सत्ता आहे. त्यामुळे निलेश राणे यांना एकट्या मालवण तालुक्यात १५ ते २० हजार मताधिक्य मिळेल. जिल्ह्यातील तिन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी होतील. यामध्ये कुडाळ, मालवण मतदार संघात नीलेश राणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळाले पाहिजे. त्यासाठी नगरपालिका निवडणुकीत अंतर्गत गटबाजी असता नये. आपण एकोपा राखला तर मालवण पालिकेत अन्य पक्षाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकत नाही, असे दत्ता सामंत म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!