आचरा संगम ते देवबाग संगम किनारपट्टीवर २७ ते २९ ऑगस्टला सागरी परिक्रमा यात्रा…
किनारपट्टीच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न ; सर्वपक्षीय मंडळींचा सहभाग : संयोजक उल्हास तांडेल यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठी किनारपट्टी लाभली असून येथे मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात. पण अलिकडच्या काळात किनारपट्टीची अनेक ठिकाणी धूप होऊन ही किनारपट्टी विद्रूप होत आहे. येथील वाळू वाहून जात आहे, त्यामुळे बीच नष्ट होत आहेत. या सर्व गोष्टींसाठी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली २७ ते २९ ऑगस्ट या कालावधीत आचरा संगम ते देवबाग संगम या किनारपट्टीत सागरी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनंतर मालवण तालुक्यातील मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक यांच्या समस्या जाणून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाला एक परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात येणार असून किनारपट्टीवरील सरपंचांची कमिटी तयार करण्यात येणार असून या कमिटी मार्फत शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे. २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वा श्री देव रामेश्वर मंदिर आचरा येथून या यात्रेला सुरुवात होणार असून २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. देवबाग येथे या यात्रेची सांगता होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने किनारपट्टी वरील गावांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे, अशी माहिती यात्रेचे संयोजक तथा देवबाग सरपंच उल्हास तांडेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देऊळवाडा सागरी महामार्ग येथील हॉटेल रामेश्वर मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी यावेळी शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, शहरप्रमुख बाळू नाटेकर, डॉ. दिपक सावंत, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण तालुकाध्यक्ष मंगेश जावकर, मच्छिमार नेते दिलीप घारे आदी उपस्थित होते. यावेळी उल्हास तांडेल म्हणाले, या यात्रेमध्ये किनारपट्टीच्या नागरिकांशी चर्चा करून प्रत्येक गावच्या समस्यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. मच्छिमारांच्या समस्या सोडविण्यासाठी व किनारपट्टीतील गावे समृद्ध आणि आनंदी होण्यासाठी एक धडक कार्यक्रम महाराष्ट्र सरकार तर्फे राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मच्छीमारांबरोबरच सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक संस्था, मच्छिमार संस्था यांचा पाठिंबा यात्रेला मिळत असे. या यात्रेनंतर जिल्ह्यात देवगड व वेंगुर्ला तालुक्याच्या किनारपट्टीवर देखील सागरी यात्रा काढण्याचा आमचा मानस आहे, असे ते म्हणाले. या सागरी यात्रेचा शुभारंभ २७ रोजी सकाळी ९.३० वा. आचरा येथील श्री देव रामेश्वर मंदिर येथून होणार आहे. त्यानंतर आचरा संगम याठिकाणी मच्छीमारांची सभा होऊन जामडूल, हिर्लेवाडी, वायंगणी, तोंडवळी, तळाशिल याठिकाणी भेटी देण्यात येणार आहेत. २८ रोजी सर्जेकोट, कोळंब, मालवण धुरीवाडा याठिकाणी सभा होणार आहेत. २९ रोजी वायरी, तारकर्ली आणि देवबाग याठिकाणी सभा घेण्यात येणार आहेत. देवबाग येथे जाहीर सभा होवून यात्रेची सांगता होणार आहे. मच्छिमारांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठीच ही सागरी यात्रा आयोजित केली असून यात कोणतेही राजकारण नाही. ही यात्रा केवळ शिवसेनेची नसून यात सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था, मच्छिमार संस्था यांनाही निमंत्रित केले असून सर्वांनी यात सहभागी व्हावे. किनारपट्टीवरील गावात भेटी दरम्यान या यात्रेसाठी मच्छीमारांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून आले. या यात्रेत मच्छिमारांनी आपले प्रश्न मांडावेत, असे आवाहन यावेळी उल्हास तांडेल यांनी केले.