निलेश राणे इम्पॅक्ट : २४ तासात “त्या” दोन्ही कामांवरील स्थगिती उठली …
सा. बां. विभागाच्या उपसचिवांकडून तात्काळ आदेश जारी
सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचे निलेश राणेंनी मानले आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपा नेते तथा कुडाळ मालवण विधानसभेचे प्रभारी निलेश राणे यांचे शासन दरबारी असलेले वजन अधोरेखित झाले आहे. मालवणच्या पर्यटन वाढीसाठी महत्वपूर्ण असलेल्या कसाल – मालवण आणि वायरी – तारकर्ली – देवबाग या रस्त्याच्या कामावरील स्थगिती उठवण्यासाठी निलेश राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र सादर केल्यानंतर २४ तास उलटण्यापूर्वीच या दोन्ही कामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिव प्रज्ञा वाळके यांनी याबाबतचे पत्र सा. बां. विभागाच्या कोकण विभागाच्या मुख्य अभियंत्यांना सादर केले आहे. या निर्णयाबद्दल भाजपा नेते निलेश राणे यांनी ना. रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले आहेत.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कुडाळ व मालवण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास निधीचा ओघ सुरू आहे. गेल्याच आठवड्यात भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील बजेटच्या एकूण २ कोटी ७० लक्ष एवढ्या निधीवरील स्थगिती उठवत विकासनिधी मतदारसंघात आणला होता. त्यानंतर कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या व दोन्ही तालुक्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या कसाल-मालवण रस्त्याच्या १ कोटी ८० लाख तर पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या वायरी-तारकर्ली-देवबाग या रस्त्याच्या १ कोटी ९९ लक्ष एवढ्या निधीवरील स्थगिती उठवण्याची मागणी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे त्यांनी केली होती. या मागणीनंतर तत्काळ ही स्थगिती उठवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहेत.