सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने मानले नगरपालिका प्रशासनाचे आभार
मालवण | कुणाल मांजरेकर
शहरातील मालवण नगरपालिकेच्या मालकीच्या मच्छिमार्केटच्या बाहेरील मासे कापण्याच्या शेडच्या दुरुस्तीच्या कामाला पालिका प्रशासनाने मान्यता देत त्याची निविदा प्रक्रिया जारी केली आहे. या कामासाठी भाजपाचे युवा नेतृत्व, सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी १५ मे २०२३ रोजी पालिका प्रशासनाला याठिकाणी पाचरण करून सदरील शेडच्या दुरुस्तीची मागणी केली होती.
मालवण मच्छिमार्केट परिसराची सौरभ ताम्हणकर आणि सहकाऱ्यांनी १५ मे रोजी पाहणी करून येथील दुरावस्थेकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. यामध्ये मच्छीमार्केट च्या परिसरात होणारी घाण आणि मासे कापण्याच्या ठिकाणाच्या पत्राशेडची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. यावेळी येथील कचरा एकत्र करण्यासाठी स्वखर्चातून दोन डस्टबिन देखील त्यांनी सुपूर्द केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून पत्राशेडची दुरुस्ती करण्याच्या कामाची निविदा जारी करण्यात आली आहे. त्यामुळे मत्स्यविक्रेत्या महिलांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. याबद्दल सौरभ ताम्हणकर मित्रमंडळाने पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.