नितेश राणे केंद्रीय मंत्री असलेल्या स्वतःच्या वडिलांची जोडाक्षरांची शिकवणी घेणार काय ?
ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा सवाल ; राणेंना केंद्रीय मंत्री पद देऊन भाजपाचाही भ्रमनिरास झाल्याची टीका
भाजपा पदाधिकाऱ्यांच्या “आमने सामने” चे आव्हान स्वीकारायला मी एकटा तयार, वेळ आणि ठिकाण जाहीर करा
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार विनायक राऊत यांना हिंदी बोलता येत नाही म्हणून नितेश राणे वारंवार त्यांच्यावर टीका करतात. मात्र नितेश राणेंच्या वडिलांचे हिंदी संसदेमध्ये संपूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे नितेश राणे केंद्रीय मंत्री असलेल्या स्वतःच्या वडिलांची जोडाक्षरांची शिकवणी घेणार का? हे त्यांनी जाहीर करावे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली आहे. देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये कोणती भाषा वापरावी याचे भान देखील नारायण राणेंना राहिलेले नाही. भाजपाने ज्या विश्वासाने त्यांना राज्यसभेची खासदारकी, मंत्रिपद दिले, तो विश्वास ते सार्थकी लावू शकले नसून भाजप नेत्यांचाही राणेंना घेऊन भ्रमनिरास झाल्याची टीका हरी खोबरेकर यांनी केली. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला आमने-सामनेचे आव्हान दिले आहे, त्याची वेळ आणि ठिकाण त्यांनी जाहीर करावे. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक असलेला एकटा हरी खोबरेकर तुम्हाला पुरून उरेल, असेही ते म्हणाले.
येथील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यालयात श्री. खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, मंदार केणी, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, दिपा शिंदे, गौरव वेर्लेकर, नरेश हुले, दादा पाटकर, महेश जावकर, जयदेव लोणे, निनाक्षी शिंदे, शिल्पा खोत, यतीन खोत, मोहन मराळ, नंदा सारंग, शांती तोंडवळकर, बाबु वाघ, ज्योती तोंडणकर, तन्वी भगत, साक्षी मयेकर, दीपा पवार, दिया पवार आदी उपस्थित होते. यावेळी श्री. खोबरेकर म्हणाले, आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्याचे काम भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि आणि शहर प्रभारी पदावर असलेल्या पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. वास्तविक राणे येण्यापूर्वी विजय केनवडेकर हे भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करत होते. राणे आल्यानंतर तुम्हाला शहर प्रभारी म्हणून काम करण्याची वेळ आली. यावरून तुमचा प्रवास कोणत्या दिशेने सुरू आहे ? याचे आत्मपरीक्षण केनवडेकर यांनी करावे, असा सल्ला हरी खोबरेकर यांनी दिला काँग्रेस, स्वतःचा पक्ष आणि नंतर ईडीच्या भीतीने भाजपात जायला आमदार वैभव नाईक म्हणजे राणे कुटुंब नव्हे. आ. नाईक हे लढावय्ये आहेत. त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गट सोडणार असल्याच्या वावड्या भाजपा पदाधिकाऱ्यांनी उठवू नये.
आमदार वैभव नाईक यांनी आजपर्यंत कुडाळ, मालवण मतदार संघातात कोट्यावधीचा निधी आणला आहे. मात्र मागील वर्षी गद्दारांचे सरकार राज्याच्या सत्तेत आल्यानंतर आमदारांनी आणलेल्या निधीला स्थगिती देण्याचे काम गद्दारांनी केले. आमदार वैभव नाईक यांनी स्वतःच्या माध्यमातून तसेच शासनाच्या माध्यमातूनही वेळोवेळी अनेकांना आर्थिक मदत केली आहे. मात्र भाजप नेत्यांसारखे या मदतीचे फोटो सेशन करण्याची वृत्ती त्यांची नाही. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमध्येही आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांनी वैयक्तिक माध्यमातून अनेकांना मदत मिळवून दिली. आपद्ग्रस्त नागरिकांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे आमदार वैभव नाईक आणि खासदार विनायक राऊत यांच्याशी कोणीही आपली तुलना करू नये. खासदार विनायक राऊत हे देशातील टॉप १० मध्ये आलेले खासदार आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री कितव्या नंबरला बसतात हे पहा असा सल्ला हरी खोबरेकर यांनी दिला.
मालवण शहरातील भुयारी गटार योजनेचे काम योग्य त्या पद्धतीने झाले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. भुयारी गटारचे काम होत नाही, तोपर्यंत या ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशी आमची मागणी आहे. याबाबत नगरपालिकेला आमदारांमार्फत पत्र देखील सादर करण्यात आले आहे. नगरपालिकेवर ठाकरे गटाची सत्ता असताना आमदार वैभव नाईक यांनी पाच वर्षात शंभर कोटीहून अधिक निधी नगरपालिकेला दिला आहे. त्यामुळे भुयारी गटार योजनेचे काम लवकरात लवकर झाले पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे.
मालवण तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून विविध रस्त्यांची कामे झाली आहेत. या रस्त्याला मंजुरी ठाकरे गटाच्या कालावधीत मिळाली असून आताचे सत्ताधारी याचे श्रेय घेण्यासाठी पुढे येतील. मात्र येथील जनतेला हे काम कोणाच्या प्रयत्नातून मंजूर झाले, हे माहित आहे. मालवण तालुक्यातील अनेक रस्ते निकृष्ट झाले असून याचे ठेकेदार कोण ? आणि या ठेकेदाराची चौकशी लावण्याचे धारिष्ट भाजपचे सरकार दाखवणार हे ? असा सवाल त्यानी हरी खोबरेकर यांनी केला.