वैभव नाईक उबाठा सोडणार ; आठवड्यात तब्बल तीनदा देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न !

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांचा पुन्हा एकदा खळबळजनक दावा

सिंधुदुर्गात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवेळी निलेश राणे कुडाळ, मालवणात जनतेच्या मदतीत व्यस्त असताना वैभव नाईक मुंबईत स्वतःच्या राजकीय स्थित्यंतरासाठी भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी होते प्रयत्नशील

मालवण | कुणाल मांजरेकर

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर हे सध्या मालवणचे संजय राऊत बनले आहेत. ज्या आमदारांची तळी उचलण्याचा ते प्रयत्न करीत आहेत, ते आमदार वैभव नाईक लवकरच उबाठा गट सोडणार आहेत. मागील आठ दिवसात त्यांनी तब्बल तीनदा भाजपाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळनक दावा भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आ. नाईक स्वतःच्या राजकीय स्थैर्यासाठी अद्यापही प्रयत्न करीत आहेत. आपल्या या दाव्याचे पुरावे देण्यास आपण तयार असल्याचेही श्री. चिंदरकर यांनी स्पष्ट केले आहे.

भाजपाच्या मालवण कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत धोंडू चिंदरकर बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील आठ दहा दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी आमदार वैभव नाईक मतदार संघात दिसून आलेत का? त्यावेळी ते स्वतःच्या राजकीय स्थैर्यासाठी आमच्या नेत्यांच्या पुढे मागे फिरत होते. तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी याबाबत आमदारांना कधीतरी याबाबत खाजगीत विचारावे. माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर बोलण्यापूर्वी स्वतःची राजकीय उंची किती आहे ते तपासावे. आमदार नितेश राणे हे विधानसभेत ज्या आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात, तेवढा आक्रमकपणा वैभव नाईक सोडाच ठाकरे गटाच्या अन्य कुठल्या आमदाराकडे आहे का ? वैभव नाईक यांच्या कुडाळ मालवण मतदार संघात रस्ते, पाण्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी कधी प्रयत्न केले आहेत का? असा सवाल धोंडू चिंदरकर यांनी केला.

वाळूचे टेंडर काढण्यासाठी प्रत्येक होडीमागे २५ हजाराची मागणी ?

आ. वैभव नाईक यांच्या निष्क्रियतेमुळे मागील दहा वर्षात मालवण कुडाळ मधील बहुतांश अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. येत्या काही दिवसावर गणेश चतुर्थी सण आला असून या रस्त्यांवरून वाळूचे डंपर फिरल्यास गणेशभक्तांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे वाळू व्यवसायिकांनी गणेश चतुर्थी होईपर्यंत वाळू व्यवसाय बंद ठेवावा, अशी प्रतिक्रिया धोंडूचिंदरकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाचे दलाल वाळूचे टेंडर काढण्यासाठी एका होडी मागे २५ हजारांची मागणी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतचे व्हाट्सअप स्क्रीनशॉट आपल्याकडे असून या आमिषाला कोणाही वाळू व्यवसायिकाने बळी पडू नये. पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपानेते निलेश राणे यांच्या माध्यमातून बहुतांश रस्त्यांसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र पावसामुळे ही कामे होऊ शकत नाहीत. गणेश चतुर्थी नंतर सर्व रस्त्यांना नुतनीकरणाला सुरुवात होणार आहे, असे सांगून आज राज्यात भाजपा आणि शिवसेनेचे सरकार आहे. त्यामुळे वाळू व्यवसायिकांनी ठाकरे गटाच्या भूलथापांना बळी पडून वाळूचे टेंडर लावण्यासाठी रक्कम भरण्या केल्यास स्वतःच्या नुकसानीला ते स्वतः जबाबदार असतील. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असे धोंडू चिंदरकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!