हरी खोबरेकर… राणेबंधूना विकास कामांचा धडा शिकवणार की शक्तीप्रदर्शनाचा ते जाहीर करा ; आम्ही दोन्हीसाठी तयार… !

विजय केनवडेकर : तारीख, वेळ, ठिकाण जाहीर करण्याचे दिले आव्हान

माजी खा. निलेश राणे यांनी सहा महिन्यात गरजू व्यक्तींना ३२ लाखांची मदत केली, ठाकरेंच्या आमदार, खासदारांनी कितीवेळा स्वतःच्या खिशात हात घातला

मालवण | कुणाल मांजरेकर

राणे बंधूनी तोंड सांभाळून बोलावे नाहीतर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर उतरून धडा शिकवला जाईल, असा इशारा ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिला आहे. या आव्हानाबाबत विकास कामांचा धडा शिकवणार की शक्तीप्रदर्शनाचा ते खोबरेकर यांनी जाहीर करावे. भाजपचे कार्यकर्ते दोन्ही प्रकारच्या आव्हानांसाठी तयार आहेत. याबाबत तारीख, वेळ आणि ठिकाण खोबरेकर यांनी जाहीर करावे, असे प्रतिआव्हान भाजपचे शहरप्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे.

मालवण येथील भाजपच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, महेश सारंग, विलास मुणगेकर, नंदू देसाई, बाबू कदम, बाबू कासवकर, दादा कोचरेकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, ललित चव्हाण, राकेश सावंत, निशय पालेकर, गौरव लुडबे, निनाद बादेकर, राज कांदळकर, चंद्रकांत मयेकर, राजा मांजरेकर आदी उपस्थित होते. यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, शिवसेनेचे नेते भाजपा सोबत सत्तेत राहून नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका करीत होते, असा बालिशपणा करणाऱ्या पक्षाने भाजपला कोणताही प्रोटोकोल सांगण्याचा प्रयत्न करू नये. नारायण राणे यांच्या सारख्या ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटा वरून अटक करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती ? आमदार नितेश राणे यांच्या मतदार संघातील खड्ड्यावरून टिका केली आहे आहे. पण आ. राणेंच्या मतदार संघातील खड्डे महाविकास आघाडी सरकारच्या मागील दोन वर्षातील कामकाजाचे कर्म आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळात दोन वर्षात विरोधी आमदारांना कोणताही निधी न देता त्यांचा मानसिक छळ करण्याचे काम करण्यात आले. यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजपा युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर युती सरकारने प्रत्येक मतदारसंघात भरीव निधी देत विकास कामांचा बॅकलॉग भरून काढण्याचे काम सुरू केले आहे. आज गगनबावडा घाटाला दीडशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या मार्गाची दुरुस्ती सुरू झाली आहे. त्याशिवाय नितेश राणेंच्या मतदारसंघात वेगवेगळ्या माध्यमातून विकासाचा निधी उपलब्ध होत असून कुडाळ मालवण मतदार संघात तुमच्या आमदाराने आणलेले सर्वच खड्डे आधी बुजवा नंतर आमच्यावर टीका करा, असे विजय केनवडेकर म्हणाले.

मालवण न. प. च्या इतिहासात निलेश राणेंच्या प्रयत्नातून भरीव निधी

मालवण नगरपालिकेला मागील सात वर्षात आमदार वैभव नाईक यांनी हे आवश्यक निधी आणू शकले नाहीत. त्या उलट माजी खासदार निलेश राणे यांनी मागील दीड वर्षात नगरपालिकेला किती कोटींचा निधी आणला आहे ते आधी बघा. त्यातील फरक जाणून घ्या, असे सांगून मालवण नगरपालिकेच्या इतिहासात शहरासाठी तब्बल १२ कोटींचा निधी आणण्याचे काम पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे यांनी केले आहे. ज्या भराडी देवीच्या यात्रेला शिवसेनेचे मुंबईतील अनेक नेते, नगरसेवक, आमदार, खासदार येतात, त्या आंगणेवाडी गावातील रस्ते करण्यास ठाकरे शिवसेना अयशस्वी ठरली. त्याउलट पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी यात्रेवेळी ३२ दिवसात आंगणेवाडी कडे येणारे पाचही रस्ते पूर्ण करून दाखवले. हा विकास नाही तर काय ? असा सवाल करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगधंदे आणले नाहीत असे बोलण्यापूर्वी सी वर्ल्ड, नाणार, जैतापूर सारख्या प्रकल्पांना आपणच विरोध केला होता याची जाणीव ठाकरे सेनेने ठेवावी, असे ते म्हणाले.

भाजपा नेते निलेश राणे यांनी मागील सहा महिन्यात कोणताही गाजावाजा न करता गरजू रुग्णांना स्वतःच्या खिशातून ३२ लाखांची मदत केली आहे. तुमच्या आमदार, खासदारांनी आजपर्यंत कोणाला आणि किती मदत केली आहे हे तुम्ही सांगू शकता का ? असा सवाल विजय केनवडेकर यांनी करून आमदार वैभव नाईक यांच्या आमदारकीच्या दोन्ही टर्म मध्ये येथील पर्यटन विकासासाठी एक तरी पर्यटन परिषद घेऊन पर्यटन व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावलात का ? याचे आत्मपरीक्षण करावे असे ते म्हणाले.

नारायण राणे यांनी १९९० च्या सुमारास कोकणात शिवसेना रुजवली म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेचे अस्तित्व दिसून येत आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी चांदा ते बांदा योजनेतून बाराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र ठाकरे सरकारने मोठा गाजावाजा करून सिंधू रत्न योजना आणताना फुटकी कवडी सुद्धा जिल्ह्याला दिली नाही. आज पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोकण रेल्वेच्या स्थानकांचे ९८ कोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण होत आहे. यातील ४२ कोटी रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वाट्याला आले आहेत. उद्या या ठिकाणी देशी विदेशी पर्यटक आल्यानंतर येथील पर्यटनाची भव्य दिव्यता पाहून हरवून जातील, असे ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!