आ. वैभव नाईकांचा शिरवंडे गावावर अन्याय ; सुनील घाडीगावकर यांचा आरोप
शिरवंडे गाव तलाठी सजेसाठी पात्र असताना डावलले ; गावातील ठाकरे सैनिक आ. नाईकांना जाब विचारण्याचे धाडस दाखवणार काय ?
शिरवंडे ग्रामस्थांना न्याय न मिळाल्यास उपोषण छेडण्याचा दिला इशारा
मालवण | कुणाल मांजरेकर
महसूली आणि गौण खनिज उत्पन्नाच्या दृष्टीने शिरवंडे गाव सरस असतानाही मागील ठाकरे सरकारच्या काळात आ. वैभव नाईक यांनी सत्तेचा दुरुपयोग करीत स्वतःच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी असरोंडी गावाला जोडलेला शिरवंडे गाव तलाठी सजेसाठी किर्लोसला जोडला आहे. भौगोलिक आणि दळणवळणाच्या दृष्टीने ही बाब शिरवंडे गावाला त्रासदायक ठरणार असून हा गाव पुन्हा एकदा असरोंडीला तलाठी सजेला जोडण्यात यावा किंवा उत्पन्नाचा विचार करून शिरवंडे गावात तलाठी सजा निर्माण करून किर्लोस गाव इकडे जोडावा, अशी मागणी माजी सभापती सुनील घाडीगावकर यांनी केली आहे. या मागणीकडे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले जाणार असून प्रशासनाने लक्ष न दिल्यास उपोषणाचे हत्यार उपसण्याचा इशारा देऊन आ. वैभव नाईक यांनी शिरवंडे गावावर केलेल्या या अन्यायाबाबत त्यांना जाब विचारण्याचे धारिष्ट्य शिरवंडे गावातील ठाकरे सेनेचे कार्यकर्ते दाखवणार का ? असा सवाल श्री. घाडीगांवकर यांनी केला आहे.
शिरवंडे गाव हा महसूली सजेसाठी असरोंडीला जोडला होता. शिरवंडे ते असरोंडी हे अंतर दोन कि.मी. एवढे आहे. मात्र ठाकरे सरकारच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी किर्लोस गावातील स्वतःच्या कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी शिरवंडे गाव महसूली सजेसाठी किर्लोस गावाला नेऊन जोडला आहे. शिरवंडे ते किर्लोस हे अंतर सुमारे सात कि.मी. आहे. याठिकाणी जाण्या येण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी एक-एक एसटी बस असून या व्यतिरिक्त वाहतूकीसाठी पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे शिरवंडे मधील गोरगरीब ग्रामस्थांना महसूली कामासाठी किर्लोसला जाण्यासाठी पायपीट करावी लागते.
या तिन्ही गावांचा विचार करता असरोंडी गावाचे महसूली उत्पन्न ८,२८८ रुपये असून किर्लोस गावाचे महसूली उत्पन्न ८,२९४ रुपये एवढे आहे. तर शिरवंडे गावाचे महसूली उत्पन्न २७,९७२ एवढे आहे. गौण खनिज उत्पन्नाचा विचार करता असरोंडी गावाचे उत्पन्न ३ लाख ७० हजार ४३५ आणि शिरवंडे गावाचे उत्पन्न २ लाख ४४ हजार ९८८ रुपये आहे. तर किर्लोस गावात गौण खनिज नाही. त्यामुळे नियमानुसार शिरवंडे गाव महसूली सजेसाठी पात्र ठरते. मात्र आ. वैभव नाईक यांनी चुकीच्या पद्धतीने शिरवंडे गाव तलाठी सजेसाठी किर्लोसला जोडून शिरवंडे गावावर अन्याय केला आहे, असा आरोप सुनील घाडीगांवकर यांनी केला आहे.