मणिपूर मधील महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मालवणात “मूकमोर्चा”

“आम्ही भारताचे लोक” यांच्यावतीने आयोजन ; देऊळवाडा ते तहसील कार्यालया पर्यंत रॅली

मालवण : मणिपूर येथे महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ‘आम्ही भारताचे लोक यांच्यावतीने शुक्रवारी मूकमोर्चा काढण्यात आला. शांतीसागर मैदान देऊळवाडा ते मालवण तहसीलदार कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात मालवणमधील नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मणिपूर येथील घटनेमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्याकडे निवेदनद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे देण्यात आले.

शुक्रवारी सकाळी देऊळवाडा येथून या मूक मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात काळे झेंडे घेऊन व काळे कपडे परिधान करून महिला व नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा तहसीलदार कार्यालय मालवण येथे आल्यानंतर कमल परुळेकर यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी नितीन वाळके, चारुशिला देऊलकर, स्वाती पारकर, हरी खोबरेकर, सेजल परब, शिला गिरकर, शिल्पा खोत, पूनम चव्हाण, गार्गी ओरसकर, मनोज गिरकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, पी. के. चौकेकर, सिद्धार्थ जाधव, तृप्ती मयेकर, अंजना सामंत, दिपा शिंदे, उमेश मांजरेकर, गौरव ओरसकर, मंदार ओरसकर, श्रीकृष्ण तळवडेकर, जेम्स फर्नांडीस, सरदार ताजर, महेश जावकर, बाबी जोगी, जयमाला मयेकर, सुमेधा नाईक आदी उपस्थित होते.

राष्ट्रपतींनी दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत!

आम्ही भारतीय नागरिक यांच्यावतीने राष्ट्रपतींना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षात देशभरात महिलांवर सातत्याने अत्याचाराच्या घटना घडत आहेत. मणिपूरमध्ये माय बहिणीवर झालेला अत्याचार तर संपूर्ण मानवजातीला कलंक ठरला आहे. महिला अत्याचाराच्या या आणि अशा सतत घडणाऱ्या घटना आणि समाजमाध्यमातूनही महिलांवर होणाऱ्या अश्लाघ्य लैंगीक शेरेबाजी मुळे आज देशभरातील महिलांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा घटना घडल्यावर अत्याचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. आम्ही महाराष्ट्र राज्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील संविधाननिष्ठ भारतीय नागरिक पिडीतांप्रती सहसंवेदना व्यक्त करत असतांनाच या निवेदनाद्वारे आपणास नम्र विनंती करीतो कि, मणिपूर आणि देशभरात अन्यत्र घडलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांचा आम्ही तीव्र निषेध: करतो, या घटनांमधील दोषीवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रपती या अधिकारात केंद्र व संबधित राज्य सरकारांना द्यावेत; आणि अत्याचारांवर कठोरात कठोर शिक्षा होऊन कायमची जरब बसेल अशी कार्यवाही करावी.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3529

Leave a Reply

error: Content is protected !!