अखेर संघर्ष संपला ; महावितरणचा जखमी वायरमन धनंजय फाले याचं निधन

फाले याच्या मृत्युनंतर कंत्राटी कामगार संघटना आक्रमक ; घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांची मागणी ; महावितरणच अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाचा हा पाचवा बळी

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ शहरातील गवळदेव जवळ वीजेच्या पोलावर काम करत असताना विजेचा शॉक लागून पडून गंभीर जखमी झालेल्या कंत्राटी वायरमन धनंजय फाले याचे आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोवा बांबूळी येथे निधन झाले आहे. त्यामुळे कर्मचारी वर्गावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर कंत्राटी वीज कर्मचारी संघटना आक्रमक बनली असून या दुर्घटनेची सखोल चौकशी करून जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी कंत्राटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक सावंत यांनी केली आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे मागील ९ महिन्यातील हा पाचवा बळी असून फाले कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील, अशी प्रतिक्रिया श्री. सावंत यांनी दिली आहे.

कुडाळ शहरातील गवळदेव जवळील अभिमन्यू हॉटेल समोरील विजवितरण कंपनीच्या पोलवर काम करीत असताना विजवितरण कंपनीचा कर्मचारी धनंजय फाले ( सध्या रा. पिंगुळी शेटकरवाडी मुळ रा. महादेवाचे केरवडे) हा विजेचा तीव्र धक्का लागून पोलवरच चिकटून राहिल्याची दुर्घटना २१ जुलै रोजी घडली होती. यावेळी वीज पूरवठा बंद करून विजवितरणचे कर्मचारी, एम.आय.डी.सी. अग्नीशमन दल व नागरीकांच्या मदतीने पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर त्याला पोलवरुन खाली उतरविण्यात आले. त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे नेण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचार सुरु असताना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

महावितरणच्या निष्काळजी पणामुळे धनंजय फाले याला प्राण गमावावा लागला आहे. नियमाप्रमाणे कंत्राटी कामगारांना पोलावर चढवण्यास मनाई असतानाही त्याला हे काम देण्यात आले. दुर्घटनेनंतर तो विजेच्या तारांना चिकटून पाऊण तास लोंबकळत होता. त्याला वेळीच खाली उतरवण्यासाठी योग्य ती यंत्रणा उपलब्ध नव्हती. त्यामुळे या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी अशोक सावंत यांनी केली आहे. आजपर्यंत अशा दुर्घटना घडल्यानंतर संघटना नेहमीच कामगारांच्या पाठीशी उभी राहिली आहे. मात्र महावितरण कडून संबंधितांवर दुर्लक्ष करण्यात येत असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!