फक्त पाहणी नाही, तात्काळ आर्थिक मदत….
भाजपा नेते निलेश राणे यांचा चेंदवण गावातील स्थलांतरीत कुटुंबांच्या व्यवस्थेसाठी मदतीचा हात ; वालावल बंगेवाडी ग्रामस्थांनाही अर्थसहाय्य
चेंदवण गावाला पूर आणि भूस्खलनचा दुहेरी धोका तर वालावल बंगेवाडी येथे दरड कोसळून घरांना धोका
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भूस्खलनचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी शुक्रवारी कुडाळचा दौरा करून येथील परिस्थितीची पाहणी केली. कुडाळ तालुक्यातील चेंदवण आणि वालावल बंगेवाडी येथे भेट देऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावेळी शासकीय मदतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या खिशातून त्यांनी अर्थसहाय्य केले.
चेंदवण गावात वेलवाडी, निरुखेवाडी परिसरात भूस्खलन सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यातच सततच्या पावसामुळे पुराचाही धोका उद्भवला आहे. अश्या परिस्थितीत निलेश राणे यांनी या गावाची पहाणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी वेलवाडी येथे भेट देत निलेश राणे यांनी खचलेल्या भागाची पहाणी केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, खचलेला डोंगर हा अतिशय धोकादायक असून धोका पत्करून धोकादायक घरात न राहता सुरक्षित जागी स्थलांतरित होण्याची विनंती करत यांच्या पुढील व्यवस्थेसाठी वेलवाडी ग्रामस्थांना निलेश राणे यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली. यावेळी येत्या काळात कायमस्वरूपी उपाययोजना योजनांसाठी प्रयत्न करू. मात्र सद्यस्थितीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी स्थलांतर आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनासोबत स्थानिक लोकप्रतिनिधींना सहकार्य करा अशी अपेक्षा व्यक्त करत चेंदवण तलाठी व मंडल अधिकारी यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.
निलेश राणेंकडून वालावल बंगेवाडी ग्रामस्थांना अर्थसहाय्य
गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुडाळ तालुक्यात अनेक ठिकाणी भूस्खलन होणाचे प्रकार सुरू असून काल वालावल बंगेवाडी येथे भूस्खलन होऊन घरांना धोका निर्माण झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपा नेते निलेश राणे यांनी त्वरित वालावल गावाशी संपर्क करून धोकादायक स्थितीत असलेल्या घरांतील स्थानिकांच्या स्थलांतराच्या सूचना दिल्या व आज वालावल बंगेवाडी येथे उपस्थित राहून सदरील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित तलाठी व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना स्थानिकांना आवश्यक सहकार्याच्या सूचना देत स्थलांतरानंतर त्यांच्या पुढील व्यवस्थेसाठी निलेश राणे यांनी ५० हजाराची आर्थिक मदत ग्रामस्थांजवळ सुपूर्द केली. यावेळी कुडाळ तालुका भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व वालावल येथील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.