विजेच्या पोलावर शॉक लागून कंत्राटी वायरमन गंभीर ; उपचारासाठी बांबुळीला हलवले

विजवितरण कडील आपत्कालीन व्यवस्थेअभावी वायरमन फाले पाऊण तास पोलवर लोंबकळत

दुर्घटनेनंतर अशोक सावंत आक्रमक ; कंत्राटी कामगाराला पोलावर चढवण्याचा आदेश कोणाचा ?

महावितरण कंपनीने उपचाराचा संपूर्ण खर्च देण्याची आग्रही मागणी

कुडाळ : कुडाळ शहरातील गवळदेव जवळील अभिमन्यू हॉटेल समोरील विजवितरण कंपनीच्या पोलवर काम करीत असताना विजवितरण कंपनीचा कंत्राटी कर्मचारी धनंजय फाले ( सध्या रा. पिंगुळी शेटकरवाडी मुळ रा. महादेवाचे केरवडे) हा विजेचा तीव्र धक्का लागून गंभीर जखमी झाला आहे. या अपघाता नंतर त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अधिक उपचारासाठी त्याला गोवा बांबुळी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातानंतर कंत्राटी वीज कामगार संघटनेचे नेते अशोक सावंत हे तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. यावेळी कंत्राटी कामगाराला विजेच्या पोलावर चढवण्याचा आदेश कोणी दिला ? असा संतप्त सवाल त्यांनी केला. वारंवार कंत्राटी कामगारांना पोलावर चढवले जात असून हे नियमबाह्य आहे. या अपघाताची जबाबदारी निश्चित करून या कामगाराच्या उपचाराचा खर्च महावितरणने करावा, अशी मागणी अशोक सावंत यांनी केली आहे.

या अपघातानंतर हा कामगार पोलवरच चिकटून राहीला. त्यानंतर तातडीने वीज पूरवठा बंद करण्यात आला आणि विजवितरणचे कर्मचारी, एम.आय.डी.सी. अग्नीशमन दल व नागरीकांच्या मदतीने पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर त्याला पोलवरुन सुरक्षित खाली उतरविण्यात आले. तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे नेण्यात आले. या अपघातात वायरमन धनंजय फाले हा गंभीर जखमी झाला आहे व दुर्दैवीरित्या भाजलाही आहे. यावेळी घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती. विजवितरणकडे कोणतीही आपत्कालीन व्यवस्था नसल्याने वायरमन फाले यांच्यावर पाऊण तास पोलवर लोंबकळत राहीले. अपघातानंतर त्याला ओरोस जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला गोव्याला हलवण्यात आले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!