मालवणात लवकरच शिवसेनेचा भव्य मेळावा ; मोठे फटाके फोडणार
तालुकाप्रमुख राजा गावकर यांची माहिती ; मेळाव्यानंतर स्वतःसोबत नेमकं कोण कोण आहेत ते वैभव नाईकांना समजेल
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणमध्ये लवकरच शिवसेनेचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मेळाव्याला निमंत्रित करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील रामेश्वर हॉटेल मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, मालवण मध्ये होणाऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्ष प्रवेशाचे मोठे फटाके फोडणार आहे. यानंतर आपल्या सोबत नेमकं कोण कोण आहे, ते आमदारवैभव नाईक यांना समजेल. याचवेळी मालवण बंदराचे उदघाट्न आणि अन्य विकास कामांचा शुभारंभ करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे सांगून चांदा ते बांदा योजना दीपक केसरकर यांनी सुरु केली. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ही योजना बंद केली. आता सिंधुरत्न नावाने ही योजना आणली गेली असून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या योजनेला निधी दिला आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी स्वतः निधी आणल्याचे सांगत फुकाचे श्रेय घेऊ नये, असे राजा गावकर म्हणाले.