खोटं बोला पण रेटून बोला, हेच आ. वैभव नाईक यांचं काम !

शिवसेनेच्या बबन शिंदे यांचा आरोप ; “सिंधुरत्न” च्या मंजूर निधीशी नाईकांचा कोणताही संबंध नाही

वर्क ऑर्डर नसतानाही आ. नाईक यांच्याकडून भूमिपूजने ; कामांची वर्कऑर्डर आल्यावर आम्ही दणक्यात भूमिपूजने करणार

मालवण | कुणाल मांजरेकर

कुडाळ – मालवण मतदार संघात सिंधुरत्न योजनेतून मंजूर झालेल्या विकास कामांचे श्रेय घेणाऱ्या ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर शिवसेनेने टीका केली आहे. मुळात या योजनेशी आ. नाईक अथवा त्यांच्या पक्षाचा कोणताही संबंध नाही. राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सरकारकडून मंजूर झालेल्या तालुक्यातील विकासकामांची भूमिपूजन करण्याचे करून त्याचे श्रेय घेण्याचे काम स्थानिक आमदार वैभव नाईक हे करत आहेत. त्यामुळे “खोटं बोला पण रेटून बोला” ही सवयच असलेल्या आमदार वैभव नाईक यांनी आपण निधी आणला असे सांगून जनतेला फसविण्याचे धंदे बंद करावेत. ते भूमिपूजन करीत असलेल्या कामाना अद्याप वर्क ऑर्डरही नसून त्यामुळेच कोणीही अधिकारी त्यांच्या भूमिपूजनात दिसून येत नाहीत. “लग्नाच्या आधी वरात आणण्याची सवय आम्हाला नाही”. त्यामुळे या कामाना वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने दणक्यात या कामांचे भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती शिवसेनेचे कुडाळ-मालवण विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.

हॉटेल रामेश्वर येथे ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावकर, पराग खोत, नीलम शिंदे, भारती घारकर, गीता नाटेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. श्री. शिंदे म्हणाले, पूर्वीच्या सरकारमधील चांदा ते बांदा आणि आताच्या सरकारमधील सिंधू-रत्न योजना ही विद्यमान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीच सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांसह अन्य घटकांना लाभ मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे या योजनेचे संपूर्ण श्रेय हे केसरकर यांनाच जाते. याउलट चांदा ते बांदा योजना बंद करण्याचे पाप मागील सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर झाले. त्यामुळे आमच्या नेत्यांनी ही योजना सुरू केले हे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगणे चुकीचे आहे. खोटे बोलण्यात माहीर असलेल्या आमदार नाईकांचे मतदार संघात गेल्या काही वर्षातील कार्य जनतेला माहीत आहे. त्यांच्याकडून केवळ जनतेची फसवणूक करण्याचे एककलमी काम सुरू आहे. त्यामुळेच ते तालुक्यातील विविध विकासकामांसाठी जो निधी मंजूर झाला आहे. तो आपणच आणला असे सांगून त्याची भूमिपूजन करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. मात्र या कामांना निधी कोणी दिला हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे आणि फुकाचे श्रेय घेऊ नये, असे बबन शिंदे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!