चिंदर गावात ४१ गुरे अज्ञात आजाराने मृत ; जिल्हा पशु वैद्यकीय अधीक्षकांकडून आढावा
पशुवैद्यकीय यंत्रणा २४ तास कार्यरत ; परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे व ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या सोबत
जनावरे मृत झालेल्या शेतकऱ्यांना भाडेतत्वावर पॉवर टीलर उपलब्ध करून देणार ; धोंडू चिंदरकर, बाबा परब यांची माहिती
मालवण | कुणाल मांजरेकर
चिंदर गावात अज्ञात आजाराने तीन दिवसात आतापर्यंत ३१ शेतकऱ्यांची ४१ गुरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हा पशु वैद्यकीय अधीक्षक (डीएचओ) डॉ. विद्यानंद देसाई यांनी चिंदर गावात सुरू असलेल्या आरोग्य उपाययोजनांचा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आढावा घेतला. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये पशुवैद्यकीय यंत्रणा २४ तास कार्यरत असून उपाययोजना सुरू असून स्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी चिंदर प्रभारी सरपंच दीपक सुर्वे, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यासह अन्य पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे व ग्रामपंचायत शेतकऱ्यांच्या सोबत असून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील चिंदर गावात अज्ञात साथीच्या रोगाने गुरे दगावण्याच्या घटना घडत आहेत. ऐन शेतीच्या हंगामात या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या साथीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पशु वैद्यकीय विभाग प्रशासकीय यंत्रणा चिंदर गावात ठाण मांडून आहेत. गुरांचे लसीकरण, अन्य औषधोपचार करण्यात येत आहेत. काही ठिकाणी ज्या जनावरांना लक्षणे जाणवत होती ती जनावरे औषध उपचाराअंती बरी होत आहेत. नेमका कोणता आजार आहे याबाबत अहवाल प्राप्त होण्याची प्रतीक्षा असली तरी प्रशासकीय यंत्रणा ग्रामपंचायत सतर्क आहे. कोणीही घाबरून जावू नये. असे आवाहन डॉ. विद्यानंद देसाई यांनी केले आहे. यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, मंगेश गावकर, संतोष गावकर, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश राऊत यासह अन्य आरोग्य पथक उपस्थित होते.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून मदत
शेतकऱ्यांची गुरे दगावली याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी माहिती दिली. पालकमंत्री यांनी तात्काळ प्रत्येक शेतकऱ्याला आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. तर निलेश राणे यांनीही शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत देणार असल्याचे सांगितले आहे. ऐन शेती हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही. शेतीसाठी पॉवर ट्रीलर भाडे तत्वावर उपलब्ध करून दिला जाईल. आवश्यक ती मदत तात्काळ केली जाईल. असे निलेश राणे यांनी सांगितले असल्याची माहिती तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बाबा परब यांनी दिली.