सिंधुरत्न योजना खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांच्याच प्रयत्नांतूनच
हरी खोबरेकर यांचे प्रत्युत्तर ; सिंधुरत्न मधील कामे कोणाच्या शिफारशीनुसार मंजूर झाली त्याची माहिती समिती अध्यक्षांकडून घेण्याचा सल्ला
मालवण : कोकणातील शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात फायदा व्हावा. त्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे या दृष्टीने खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून सिंधू-रत्न योजना शासनाने राबविली आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत सुचविलेल्या कामांना कोणाची शिफारस होती याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी योजनेच्या अध्यक्षांकडुन घ्यावी आणि नंतरच खासदार, आमदार यांच्यावर टीका करावी, असा सल्ला ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सोमवारी मालवण मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, बाबी जोगी, उमेश मांजरेकर, उमेश चव्हाण, गौरव वेर्लेकर, गणेश चव्हाण, सुहास डिचवलकर, श्री. वस्त, श्री. मोंडकर, अक्षय भोसले आदी उपस्थित होते. श्री. खोबरेकर म्हणाले, केंद्रीय मंत्री नारायण राणे येथे आल्यानंतर त्यांनाच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून आले. भाजपचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यातच मनोमिलन नाही. त्यामुळेच त्यांनी कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला. काही झालं तरी तुम्ही एकत्रित काम केले पाहिजे असे सांगावे लागले. राणेंना प्रथमच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे एकदिलाने काम करत नाहीत. त्यामुळे उमेदवार कोणीही असला तरी तुम्ही सर्वांनी एकत्र या असे सांगावे लागले. त्यामुळे आमदार, खासदारांवर टीका करण्यापूर्वी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपले नेते खोटे बोलतात की आपण हे पाहावे असा सल्ला श्री. खोबरेकर यांनी दिला.
खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांनी जे काम होणे शक्य आहे. त्याच कामाची त्यांनी जनतेला आश्वासने दिली आणि तीच कामे मार्गी लावण्याचे प्रामाणिकपणे काम केले आणि येणाऱ्या काळातही अशाच पद्धतीने कामे मार्गी लावली जातील. मंजूर होणाऱ्या विविध कामांच्या पत्रावर पालकमंत्री यांचीच स्वाक्षरी असते. त्यामुळे विविध योजनांमध्ये कामे सुचविण्याचा, शिफारस करण्याचा अधिकार जिल्हा नियोजनाचा सदस्य म्हणून खासदार, आमदार यांना असतो. त्यामुळे शहरात, तालुक्यात सध्या जी काही कामे मंजूर झाली आहेत. ती कोणाच्या शिफारशीनुसार झाली याची माहिती सिंधू रत्न योजनेच्या अध्यक्षांकडुन घ्यावी. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये असे श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.
सिंधू रत्न योजनेचे जनकच महाविकास आघाडीचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यांनी ३०० कोटींची तरतूद केली होती. त्यावेळी जेवढे प्रस्ताव आले. तेवढे पैसे देण्यात आले. आता प्रस्तावांची संख्या जास्त आहे. मात्र आवश्यक निधी या शासनाकडून संबंधित घटकाला मिळत नाही ही शोकांतिका आहे. या योजनेचा उद्देश सर्वसामान्यांचे दरडोई उत्पन्न वाढावे हा आहे. कोणाचे मासिक उत्पन्न वाढावे हा नाही. त्यामुळे या योजनेंतर्गत जेवढे प्रस्ताव येतील त्या प्रस्तावांना मंजुरी द्यायला हवी अशी आमची मागणी आहे.
सध्या भाजपचे पदाधिकारी तालुका, शहरातील विविध विकासकामे ही निलेश राणेंच्या माध्यमातून होत असल्याचे भासवित आहेत. परंतु त्यांनी यापूर्वी तळाशील येथील बंधाऱ्यासाठी दहा दिवसांत १० कोटी देतो असे सांगितले प्रत्यक्षात काही काम सुरू नाही. देवबाग येथे केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते बंधाऱ्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. मात्र वर्ष उलटून गेले तरी अद्याप या कामाचा पत्ता नाही. त्यामुळे निलेश राणे केवळ खोटी आश्वासनेच देत असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जी कामे जनतेसाठी करणे आवश्यक आहेत ती कामे पक्षाच्या माध्यमातून मार्गी लावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असेही श्री. खोबरेकर यांनी स्पष्ट केले.