नारायण राणेंचे कार्यकर्त्यासमवेत स्नेहभोजन ; टिफिन बैठकीतून मोदी सरकारच्या यशस्वी कारकिर्दीचा उजाळा !

मोदी @ ९ अंतर्गत सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवनमध्ये कार्यक्रम

अंतर्गत वाद असतील तर आताच मिटवा, पण आगामी सर्व निवडणुकांमध्ये १०० % यश मिळालेच पाहिजे : राणेंच्या पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना

सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर

मोदी @ ९ अभियानाचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषी भवन मध्ये टिफिन बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील ९ वर्षात देशपातळीवर घेतलेल्या निर्णयांची माहिती देऊन त्यांच्यामुळेच आज जागतिक स्तरावर देशाची मान अभिमानानाने उंचावली आहे. त्यामुळे तुम्ही गावागावात जाऊन मोदींच्या लोकहीतकारी निर्णयांची माहिती द्या. आज केंद्रात भाजपचे ३०३ खासदार आहेत. पण येत्या लोकसभा निवडणुकीत किमान ४०२ खासदार निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला आहे. तुम्ही देखील आपापासातील वाद असतील तर ते आताच मिटवा. आणी पक्षाला यश मिळवून देण्यासाठी एकजूट दाखवा. येत्या काळात होणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांसह जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळालेच पाहिजे, असे आवाहन ना. राणे यांनी यावेळी केले. यावेळी ना. राणे यांनी सहकारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

सिंधुदुर्गनगरी ओरोसमध्ये आयोजित टिफिन बैठकीच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्याला सौ. नीलम राणे यांच्यासह रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे प्रभारी माजी आ. प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मनोज रावराणे, प्रसन्ना देसाई यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ना. राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आज महासत्तेकडे झेप घेत असून जगात आपल्या पंतप्रधानांचे कौतुक होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा देशात ४०२ खासदार निवडून आणण्यासाठी व नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या सर्व ५३ योजना घराघरापर्यंत पोहोचवाव्यात. जिल्ह्यात पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणलेच पाहिजे. निवडणुकीत मी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. त्यामुळे जातीभेद, गटातटाचे राजकारण विसरून एकजुटीने कामाला लागा. गावागावात भाजपा बळकट करा, असे आवाहन ना. राणे यांनी करून राष्ट्रीय स्तरावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पक्षसंघटन कार्याचे कौतुक झाले पाहिजे या दृष्टीने कामाला लागा असे आवाहन केले. यावेळी जिल्ह्यात मोदी @९ अभियान प्रमोद जठार यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राबवल्या बद्दल त्यांनी कौतुक केले.

भाजपा हा महासागर ; सोबत येतील त्यांना सामावून घेणार

या कार्यक्रमात नारायण राणे यांनी राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर आपलं मत व्यक्त केलं. भारतीय जनता पार्टी हा महासागर आहे. समुद्राच्या पोटात जे येतात. त्यांना समुद्र आपल्यात सामावून घेतो. त्यामुळे भाजपात कोण कोण येतायत. त्या बाबत काळजी करू नका. आपल्याला देश मोठा करायचा आहे. आणी सोबतच आपला पक्ष देखील मोठा करायचा आहे, असेही राणे म्हणाले.

भारत देश आज महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. २०३० साली देश जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या क्रमांकावर येईल. त्यासाठी आपणा सर्वाना मेहनत घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनीही हे आव्हान स्वीकारले आहे. आपला पक्ष जगात मोठा आहे व आपले पंतप्रधान जगात लोकप्रिय आहेत. २०२४ च्या निवडणुकीत आपलेच सरकार सत्तेवर येणार असून येथील खासदार आणि तिन्ही आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून यायला हवेत. उमेदवार कोण असणार याची चर्चा नको. जो उमेदवार असेल तो मोठ्या मताधिक्क्याने निवडून आला पाहिजे. कोणतेही गट तट, जाती पातीचे राजकारण मला चालणार नाही. अशी सक्त सूचना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी देश सुखी समाधानी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत, केंद्र सरकार, राज्य सरकार जनतेच्या हितासाठी करत आहे. त्यामुळे आपणही शासनाच्या योजना तळागाळापर्यत पोहोचवून काम करा. विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही. फक्त मोदी विरोध हाच अजेंडा घेऊन देशातील १८ पक्ष आज मोदींच्या विरोधात एकत्र येत असून या सर्वांचे मिळून ६० खासदारही निवडून येणार नाहीत. आपल्याला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी अंतर्गत वाद मिटवा. पक्षासाठी सर्वांनी एकजूट दाखवा. एकमनाने आणि एकदिलाने काम करा असे आवाहन नारायण राणे यांनी केले

मनीष दळवींकडून आदरातिथ्य !

भाजपच्या टिफिन बैठकीत जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या आदरतिथ्याचे दर्शन पाहायला मिळाले. कार्यकर्ता मेळाव्यानंतर ना. राणे यांनी सहकारी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या समवेत स्नेहभोजन केले. यावेळी मनीष दळवी जातींनीशी सर्वांच्या जेवणाची व्यवस्था पाहात होते. सर्व पदाधिकारी आणी मान्यवर यांचे जेवण झाल्यानंतरच मनीष दळवी यांनी स्वतःचे जेवण उरकून घेतले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!