अभियांत्रिकी पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश मुदतीत वाढ
एम.आय.टी.एम कॉलेज सुकळवाड येथे शासनमान्य सुविधा केंद्र ; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
तंत्रशिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य व राज्य सामाईक प्रवेश परीक्षा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता होणाऱ्या अभियांत्रिकी पदवी व पदविका प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेकरिता मुदतवाढ देण्यात आली आहे. अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्ष प्रवेश प्रकियेच्या नोंदणीसाठी नोंदणी अर्ज भरण्यासाठी १० जुलै पर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे. व अर्ज निश्चित करणेकरिता ११ जुलैपर्यंत मुदत वाढ करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका नोंदणी प्रवेशासाठी १५ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. १७ जुलैला संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रदर्शित होतील.
अभियांत्रिकी प्रथम वर्ष पदवी व पदविका प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना विहित मुदतीत प्रवेश अर्ज भरून निश्चित करण्यासाठी मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शासनमान्य सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना मोफत फॉर्म भरून देण्यात येत असून या सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सुकळवाड, सिंधुदुर्ग कॉलेजचे प्राचार्य सूर्यकांत नवले यांनी केले आहे.