“एमटीडीसी” च्या “इसदा” ला जलपर्यटन प्रशिक्षण संस्था म्हणून मेरिटाईम बोर्डाकडून अधिकृत मान्यता ….

पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा विशेष पुढाकार ; स्थानिकांना जलपर्यटनाचे प्रशिक्षण होणार आणखी सुलभ

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या तारकर्ली येथील “इसदा” या प्रशिक्षण संस्थेला महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डा कडून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे स्थानिकांना जल पर्यटनाचे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र मिळणे स्वस्त आणि सुलभ होणार आहे.

महाराष्ट्रामध्ये जलपर्यटन विकासासाठी मोठी संधी आहे. जलपर्यटन उच्च दर्जाचे आणि सुरक्षित बनविण्यासाठी जलपर्यटन क्षेत्रातील प्रशिक्षित कुशल मनुष्यबळाचा विकास करणे गरजेचे आहे. स्थानिक युवकांना प्रशिक्षित केल्यास त्यांना रोजगार निर्माण होईल. महाराष्ट्रात समुद्र आणि गोड्या पाण्याच्या क्षेत्रात वर्षाला अनेक पर्यटक/स्थानिक बुडून मरण पावतात. हे टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रशिक्षित जीव रक्षक असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्रामध्ये जलपर्यटन विकसित करण्याच्या दृष्टीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अ‍ॅक्वाटिक स्पोर्टस (IISDA- इसदा), तारकर्ली, ता. मालवण जि. सिंधुदुर्ग येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची जल पर्यटन प्रशिक्षण संस्था वर्ष २०१५ मध्ये निर्माण आणि प्रचलित केली. इसदा जलपर्यटन प्रशिक्षण केंद्र भारतातील पहिले आणि आशिया पॅसिफिक क्षेत्रातील मोठयापैकी एक आहे. सिंधुदुर्गच्या समुद्री विश्वातील खजाना सर्वप्रथम जगासमोर आणणारे प्रख्यात सागर संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांच्या देखरेखी खाली इसदा ची वाटचाल सुरु असून पर्यटन विकास महामंडळाने महाराष्ट्रातील जलपर्यटन विकासाची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे.

इसदाने हजारो विद्यार्थी, पर्यटक, स्थानिक युवक, वन खात्याचे अधिकारी, भारतीय वायू दलाचे अधिकारी यांना स्नॉर्कलिंग, स्कूबा डायव्हिंग, समुद्री संशोधन, लहान बोटी प्रचलन इत्यादीचे प्रशिक्षण दिले. इसदामुळे सिंधुदुर्ग जिल्हा स्कूबा आणि जल पर्यटनच्या जागतिक नकाशावर आले. ह्या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग मध्ये हजारो स्थानिकांना शाश्वत रोजगार मिळाला आणि सागरी पर्यटनावर आधारित मोठी अर्थव्यवस्था नव्याने उभी राहिली.
मपविमच्या इसदामधील पायाभूत सुविधा आणि तांत्रिक आणि अनुभवी मनुष्यबळ उच्च दर्जाचे आहे. स्थापनेपासून गेल्या ८ वर्षात, इसदाने यशस्वीरीत्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला वैशिष्ठ्यपूर्ण सागरी पर्यटनामध्ये प्रस्थापित केले आहे. इसदाने जलपर्यटन, समुद्री जीव संवर्धन, कौशल्य विकास आणि पाण्याशी निगडीत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये अल्पावधीतच स्वतःचे राष्ट्रीय पातळीवर महत्वाचे स्थान निर्माण केले आहे. परंतु इसदाला जलपर्यटनातील महत्वाचे घटक म्हणजे बोट चालविणे, जेट स्की चालविणे, जीव सुरक्षा ह्याचे स्वतः प्रशिक्षण देऊन प्रमाण पत्र देण्यास अद्याप महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाची मान्यता नव्हती त्यामुळे सदर संस्थेचे प्रशिक्षण बहुंताशी स्कूबा डायव्हिंगशी मर्यादित होते. त्यामुळे स्थानिकांना सदर प्रशिक्षणासाठी बाह्य प्रशिक्षणावर अवलंबून राहावे लागत होते व प्रशिक्षण खूप खर्चिक होत असे. तसेच प्रमाणपत्र मिळण्यास आणि प्रमाणपत्राचे नुतनीकरण करण्यास विलंब लागत होता. त्यामुळे कोकण आणि महाराष्ट्रात जल पर्यटन बहरत असताना जल पर्यटन क्षेत्रातील शासनाच्या प्रशिक्षण संस्थ्येची उणीव प्रकर्षाने जाणवत होती. ही बाब लक्षात घेऊन मंगलप्रभात लोढा, पर्यटन मंत्री यांच्या पुढाकारातून, सौरभ विजय आणि राधिका रस्तोगी प्रधान सचिव, पर्यटन विभाग, श्रद्धा जोशी शर्मा, व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या प्रयत्नाने महामंडळाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला प्रस्ताव पाठविला होता. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सकारात्मक पाऊले उचलून, शासकीय जल पर्यटन प्रशिक्षण संस्थ्येची गरज ओळखून आणि इसदाच्या पायाभूत सुविधा आणि अनुभवाचा अभ्यास करून इसदाला बोट चालविणे, जेट स्की चालविणे, जीवसुरक्षा ह्याचे प्रशिक्षण देणे आणि त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी मान्यता दिली आहे. स्थानिकांना जल पर्यटनासाठी लागणारे प्रशिक्षण किफायतशीर दरात तसेच हवे तेव्हा मिळणार आहे आणि प्रशिक्षणानंतर प्रमाणपत्र तात्काळ मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांना जल पर्यटन व्यावसायिक आणि सुरक्षतेच्या दृष्टीने व्यवस्थित चालवायला मिळणार आहे. आता सिंधुदुर्ग आणि कोकणवासियांना हक्काची जल पर्यटनासाठी प्रशिक्षण संस्था मिळालेली आहे. ह्याचा फायदा भविष्यात उच्च दर्जाचे, व्यावसयिक, कायदेशीर आणि सुरक्षित जल पर्यटन विकसित करण्यासाठी होईलच तसेच स्थानिकांना जल पर्यटनाच्या माध्यमातून शाश्वत रोजगार मिळण्यास मदत होईल. तसेच भविष्यात शासनाला स्थानिकांसाठी जल पर्यटन क्षेत्रातील विविध प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे सोयीस्कर होणार आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!