कट्टा येथील “त्या” विकृतांचा शोध घ्या ; नाहीतर आक्रमक पावित्रा घेणार
गाबीत समाज आणि मच्छीमार संघटनांचा इशारा ; कट्टा येथील “त्या” जागेची पाहणी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातून कट्टा येथे मच्छी विक्रीसाठी जाणाऱ्या महिलांच्या मासळीत फिनेल, ब्लिचिंग पावडर आणि मुंग्याची पावडर टाकून खराब करण्याचा आणि काही मासे चोरून नेण्याचा संतापजनक प्रकार शनिवारी घडला होता. या प्रकारानंतर गाबीत समाज आणि मच्छीमार संघटनानी आक्रमक पावित्रा घेतला आहे. आज कट्टा मच्छी मार्केट येथे पाहणी करत असे विकृत कृत्य करणाऱ्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा, अन्यथा आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
कट्टा ज्या ठिकाणी माशांवर विषारी द्रव्य टाकून नासधूस करण्यात आली त्याठिकाणी तसेच कट्टा मच्छी मार्केट येथे मच्छिमार नेत्यांनी पाहणी करत नुकसान ग्रस्त मच्छी विक्रेत्या महिलांशी तसेच उपस्थित पोलिसांशी देखील चर्चा केली. यावेळी श्रमिक मच्छिमार संघांचे अध्यक्ष छोटू सावजी, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बाबी जोगी, नॅशनल फिश वर्कर फोरमचे रविकिरण तोरसकर, सिंधुदुर्ग जिल्हा मच्छिमार सोसायटी फेडरेशन अध्यक्ष मेघनाद धुरी, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर, विकी चोपडेकर, हेमंत मोंडकर, संमेश परब, गाबीत समाज संघटनेच्या सेजल परब, अन्वेषा आचरेकर आदी उपस्थित होते.
माशांची नुकसानी करण्याचा प्रकार निंदनीय असून महिला मच्छी विक्रेत्यांच्या पाठीशी सर्व मच्छिमार संघटना ठामपणे उभ्या आहेत. हा प्रकार ज्या कुणी विकृत व्यक्तीने केला असेल त्याचा शोध घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. या महिला भगिनींना न्याय मिळालाच पाहिजे. पोलीस यंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास असून पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेऊन त्या पद्धतीने तपास करावा. या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे. तसेच ग्रामपंचायतीला मच्छी विक्रेत्या महिलांबाबत काही आक्षेप होते तर त्यांनी कायदेशीर कार्यवाही करणे आवश्यक होते. पोलिसांनी या प्रकाराचा छडा न लावल्यास आम्ही आक्रमक भूमिका घेऊन आमच्या पद्धतीने शोध घेऊ, असे यावेळी मच्छिमार नेत्यांनी सांगितले.