सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन
सिंधुदुर्ग : सनातन संस्था, सिंधुदुर्गच्यावतीने सोमवार, ३ जुलै या दिवशी (आषाढ पौर्णिमा कलियुग वर्ष ५१२५) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन, लघुपट, ग्रंथ आणि फलक प्रदर्शन, तसेच स्वसंरक्षणविषयक प्रात्यक्षिके असा कार्यक्रम होणार आहे.
यावेळी ‘संवैधानिक आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संकल्प करा !’ या विषयावर वक्त्यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी ३.३० वाजता हा महोत्सव होईल. श्री गुरु हे समाज, राष्ट्र आणि धर्म यांचे खरे रक्षक असतात. आर्य चाणक्य यांनी सम्राट चंद्रगुप्त, तर समर्थ रामदासस्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक अन् धर्मांध दुष्प्रवृत्तींचे निर्मूलन केले आणि सुराज्य स्थापन केले. गुरु- शिष्यांचा हा तेजस्वी इतिहास आपल्याला ज्ञात आहे. आजही समाज, राष्ट्र अन् धर्म यांची स्थिती दयनीय आहे. लोकशाहीतील जनतेचे शोषण करणाऱ्या दुष्प्रवृत्तींविरुद्ध कृती करणे आणि रामराज्यासम ‘हिंदु राष्ट्र’ स्थापणे यांसाठी गुरूंच्या आशीर्वादाने कृतीशील होण्याचा संकल्पदिन म्हणजे गुरुपौर्णिमा ! गुरुपौर्णिमा महोत्सवात तन-मन-धन यांनी सहभागी होण्याने गुरूंचा आशीर्वाद लाभेलच, तसेच हिंदूंचे संघटनही होईल. यासाठी या गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, जामसंडे, देवगड, मातोश्री मंगल कार्यालय, नवरे हॉस्पिटल समोर, कणकवली, श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, रेल्वे स्थानक रस्ता, कुडाळ, मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण, साई दरबार सभागृह, वेंगुर्ला, साळगावकर मंगल कार्यालय, आरवली, वेंगुर्ला, खानोलकर मंगल कार्यालय, मळगाव, सावंतवाडी, श्री महालक्ष्मी – स्थापेश्वर मंदिर सभागृह, डेगवे, सावंतवाडी, आशीर्वाद मंगल कार्यालय, झरेबांबर, दोडामार्ग या ठिकाणी गुरूपौर्णिमा महोत्सव साजरा होणार आहे, अशी माहिती सनातन संस्थेचे शंकर निकम यांनी दिली आहे.