निलेश राणेंच्या “त्या” आश्वासनाची लवकरच पूर्तता ; केंद्र शासन स्तरावर हालचाली सुरू
तळाशिलच्या बंधाऱ्याचा प्रस्ताव तातडीने तयार करा ; केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांचे आदेश
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुक्यातील तळाशिल येथिल धुपप्रतिबंधक बंधाऱ्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही भाजप नेते निलेश राणे यांनी दिली होती. या आश्वासनाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या पत्रानुसार केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या बंधाऱ्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश संबंधित खात्याला दिले आहेत. त्यामुळे तळाशीलवासियांचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
मालवण तालुक्यातील तळाशील गावातील धुपप्रतिबंधक बंधारा वाहून गेल्याने येथील जमीनीची धूप होत आहे. येथील किनारपट्टी समुद्राने गिळंकृत केली असून येथील नागरी वस्तीला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट रोजी येथील बंधाऱ्यासाठी बेमुदत उपोषण छेडले होते. त्यावेळी भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी याठिकाणी भेट देऊन येथील बंधाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून किमान १० कोटी रुपये निधी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार ना. राणे यांनी याबाबत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याशी या बंधाऱ्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार ना. शेखावत यांनी आपल्या खात्याला या बंधाऱ्याबाबत तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे तळाशील ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्णत्वास जाण्याच्या दिशेने तयारीला वेग आला आहे.