मत्स्यविक्रेत्या महिलांच्या माशात ओतलं फिनेल आणि मुंग्याची पावडर ; सव्वा लाखांचे नुकसान
मालवण कट्टा येथील निंदाजनक प्रकार ; अज्ञाता विरोधात कट्टा दुरक्षेत्रात तक्रार दाखल
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरातून कट्टा येथे मासे विक्री साठी घेऊन जाणाऱ्या सहा महिलांनी ठेवलेल्या माशात अज्ञातांनी फिनेल, मुंग्याची पावडर आणि ब्लिचिंग पावडर टाकल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी घडला आहे. यामुळे हे मासे खराब होऊन सुमारे सव्वा लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी महिलांनी कट्टा पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली आहे. या घटनेने सदरील महिलांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते.
मालवणातील या मासे विक्रेत्या महिलांनी एका खासगी जागेत हे मासे ठेवले होते. यामध्ये ताज्या माशांबरोबरच सुक्या माशांचाही समावेश होता. त्यापैकी काही ताजे मासे चोरून देखील नेण्यात आले. हे विषारी द्रव्य ओतल्याने हे सर्व मासे विक्री करण्याच्या लायक राहिले नाहीत. हे सर्व मासे त्यांना आता फेकून द्यावे लागणार आहेत. आपल्या चाळीस वर्षाच्या मासे विक्रीच्या कारकिर्दीत मालवण तालुक्यात कट्टा येथे घडलेला पहिलाच निंदनीय प्रकार असल्याची प्रतिक्रिया यावेळी मासे विक्रेत्या महिलांनी व्यक्त केली. स्थानिक ग्रामस्थांनी देखील याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.