अन्यथा “त्यांना” “मनसे प्रसाद” देणार …

मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल यांचा इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण तालुक्यातील कट्टा येथे मत्स्यविक्री करणाऱ्या महिलांच्या मासे ठेवलेल्या पेटीमध्ये फिनेल व ब्लिचिंग पावडर ओतण्याचा घडलेला प्रकार निंदनीय आहे. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल तपास करून दोषींना योग्य ते शासन करावे. अन्यथा मनसे या घटनेतील सडक्या मेंदूच्या प्रवृत्तींना शोधून काढून “मनसे प्रसाद” देईल, असा इशारा मनविसे उपजिल्हाध्यक्ष प्रतिक कुबल यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.

कट्टा येथे घडलेला प्रकार अत्यंत निषेधार्थ आहे. असल्या व्यक्तींना वेळीच शासन होणे गरजेचे आहे. मत्स्यविक्रेत्या महिला दिवसभर जिवाचं रान करून मासे घेऊन विक्री करतात. पोटचे पैसे सारून आपला उदरनिर्वाह करतात. अश्यावेळी त्यांच्या सोबत असा प्रकार घडणे फार निंदनीय आहे. जोपर्यंत या मत्स्यविक्री करणाऱ्या महिलांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत मनसे त्यांच्या पाठीशी ठामपणे खंबीर उभी राहील. असले दळभद्री चाळे करताना पुढच्या वेळी १०० वेळा विचार करतील, अशी अद्दल मनसेकडून घडविली जाईल, असे प्रतिक कुबल यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!