राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखालील सिंधुदुर्ग बँक भविष्यात १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचा टप्पा गाठेल….
आ. प्रवीण दरेकर यांचा विश्वास ; बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या कार्याचं कौतुक
सहकारात मोठी ताकद ; सहकाराच्या माध्यमातून कोकणच्या विकासाचा आराखडा तयार करूया : आ. दरेकर
सिंधुदुर्गनगरी | कुणाल मांजरेकर
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४० वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील शरद कृषी भवनच्या सभागृहात संपन्न झाला. आपणा सर्वांचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे. आगामी काळात राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग बँक १० हजार कोटी गुंतवणुकीचा टप्पा निश्चितपणे गाठेल, असा विश्वास मुंबई बँकेचे चेअरमन तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते, भाजपा नेते आ. प्रवीण दरेकर यांनी यावेळी व्यक्त केला. सहकारात मोठी ताकद आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्हा बँकांनी ठरवलं तर सहकाराच्या माध्यमातूनच कोकणचा विकास शक्य आहे, त्यासाठी राज्य सरकारवर देखील अवलंबून राहावं लागणार नाही. आज विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा बँका तेथील राजकारण्यांमुळे डबघाईला आल्या असल्या तरी कोकणातील पाचही जिल्हा बँका “अ” वर्गात आहेत. त्यामुळे येथील फलोत्पादन, मत्स्यव्यवसाय, पर्यटन उद्योगाला गती देऊन सहकाराच्या माध्यमातून योग्य आराखडा तयार करून कोकणच्या विकासासाठी येत्या काळात प्रयत्न करूया. केंद्रात राणेसाहेबांकडे एमएसएमई सारखे वजनदार खाते आहे. तसेच राज्यात आणि केंद्रात आपलं सरकार आहे, त्यामुळे शासन स्तरावरूनही सर्वतोपरी मदत मिळेल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आज बँकेच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व आजी माजी अध्यक्ष, संचालक, कर्मचाऱ्यांना एकत्र आणण्या बरोबरच कोकणातील सर्व जिल्हा बँकांच्या अध्यक्षांना देखील एकाच व्यासपीठावर आणण्याचा योग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी जुळवून आणला आहे. याबद्दल आ. दरेकर यांनी कौतुक केले.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ४० वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी संपन्न झाला. मुंबई सहकारी बँकेचे चेअरमन आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन जयंत पाटील, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन राजेंद्र पाटील, राज्य सहकार बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे, आमदार नितेश राणे, जिल्हा बँकेचे चेअरमन मनीष दळवी, व्हाईस चेअरमन अतुल काळसेकर, माजी अध्यक्ष राजन तेली, अजित गोगटे, व्हिक्टर डॉन्टस यांच्यासह सर्व संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, माजी सरव्यवस्थापक अनिरुद्ध देसाई तसेच माजी संचालक, बँकेचे आजी माजी अधिकारी, कर्मचारी, शेतकरी, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
प्रारंभी बँकेचे माजी संचालक, सेवानिवृत्त अधिकारी, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये पी. के. सावंत, राजन तेली, अनिरुद्ध देसाई, मणेरीकर, जे. डी. तावडे यासह अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी मायक्रो एटीएम, सोशल मिडीया चॅकपॉटचा शुभारंभ आ. प्रविण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद सावंत यांनी केले
यावेळी बोलताना आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासासाठी सहकाराची जोड आवश्यक आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा कोकणात सहकार हवा तसा रुजला नाही. पण राज्यातील अन्य विभागातील बँकांच्या पेक्षा कोकणातील बँकांचे काम दर्जेदार आहे. कोकणातील पाचही जिल्हा बँका अ वर्ग दर्जामध्ये आहेत. आज सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने विविध उपक्रम राबविले. २० कोटी वरून ५ हजार कोटी पर्यंत मजल आपण मारत आहोत. कोकणातील या पाचही बँकांनी एकत्रित येऊन सहकाराच्या माध्यमातून काही कोटीचा प्रकल्प आराखडा तयार केल्यास येथे रोजगारात्मक विकास उद्योग उपक्रम राबवू शकतो. त्यासाठी केंद्रीय सूक्ष्म लघु उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्राची जोड घेतल्यास या पाचही जिल्ह्यांचा विकास होऊ शकतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाला आणि येथील नैसर्गिक संपत्तीला भरपूर वाव आहे. येथे काही हजार कोटीचे प्रकल्प येथील उद्योजकांच्या माध्यमातून उभे राहिल्यास तरुणांना रोजगार मिळू शकेल. आपण या पाचही बँकांच्या माध्यमातून काही हजार कोटींची भाग भांडवल उभी करून सहकार विकास आराखडा तयार करून त्या दृष्टीने प्रयत्न करूया व नियोजन करूया. कोकणच्या विकासासाठी यातून गती मिळू शकेल. आज कोकणातील पाचही बँका सक्षम असून ४० ते ७० हजार कोटीचा आराखडा तयार करूया. यासाठी शासनाची जोड घेऊन नाबार्ड किंवा आरबीआयच्या माध्यमातून अटी शिथिल करण्यासाठी केंद्र सरकारकडे आपण प्रश्न मांडून प्रयत्न करू. सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट यांच्या विविध उद्योगातून आर्थिक विकासाला हातभार लावूया, असेही दरेकर म्हणाले
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, कोकणात सहकार रुजला पाहिजे. या दृष्टीने गेले अनेक वर्षांपूर्वीपासून शिवरामभाऊ जाधव, भाईसाहेब सावंत आणि त्यानंतर डी. बी. ढोलम यांनी हे लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या बँकेने वीस कोटी वरून पाच हजार कोटी पर्यंत मजल मारली आहे. बदलत्या काळात नीतीही बदलत गेली. कोकणातील माणूस वेगवेगळ्या क्षेत्राकडे आधुनिकतेने वळू लागला. येथील काजू , आंबा या उत्पादनातील मालाला प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची जोड घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने कृषी विद्यापीठाचा एक विभाग निर्माण केला आहे. येथील नव उद्योजकांना जिल्हा बँकेने मायक्रो फायनान्सची यापुढे जोड दिली पाहिजे. तसेच मोबाईल बँकिंग प्रक्रिया राबविली पाहिजे, असे ते म्हणाले.
ठाणे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील म्हणाले, कोकणात सिंधुदुर्ग सह पाच जिल्हा बँका अ वर्ग दर्जात आहेत. कोकणातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी विविध उद्योग उभारण्यासाठी यापुढे प्रयत्न केले पाहिजेत. बचत गटाला कर्ज देताना महिलांना उद्योग प्रशिक्षण देऊन त्या दृष्टीने उद्योग कर्ज दिले पाहिजे आणि उद्योग क्षेत्राशी बँका टाईप करून प्रक्रिया उद्योग राबविले गेले पाहिजेत.
आमदार नितेश राणे म्हणाले बँकेच्या चाळीस वर्षाच्या या घोडदोडीत वीस कोटींवरून पाच हजार कोटी पर्यंत व्यवहार करून जिल्हा बँक प्रगतीपथावर आली आहे. त्यामध्ये अनेकांचे सहकार्य लाभले आहे. यापूर्वीचे माजी संचालक, चेअरमन, अधिकारी कर्मचारी यांनी घेतलेल्या मेहनतीतून ही बँक आज वटवृक्ष झाली आहे. आपली हक्काची बँक आपली बँक म्हणून शेतकरी विश्वासाने इकडे वळत आहेत. ही विश्वासार्हता कायम टिकविण्यासाठी आम्ही संचालक मंडळामध्येही त्या दृष्टीने कर्ज उपलब्ध करून देताना प्रयत्न करतो. सिंधुदुर्गात ५० ते ६० लाखापर्यंत कर्ज येणारे उद्योजक पुढे येत आहेत. हे कर्ज १ कोटीच्या बाहेर घेणारे उद्योजक निर्माण करूया आणि येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊया, असे ते म्हणाले.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले, बँकेच्या चाळीस वर्षाच्या इतिहासात शिवरामभाऊ जाधव यांच्यासारखे चेअरमन, माजी संचालक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीतूनच बँकेची वाटचाल प्रगतीपथावर आहे. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी जिल्हा बँक विविध सुविधा उपलब्ध करून देत आहे. मायक्रो फायनान्स, डॉट एटीएम मोबाईल सुविधा अशा अनेक सेवा उपलब्ध करून देणारी जिल्हा बँक जिल्ह्यातील महत्त्वाची बँक असून भविष्यात जिल्हा बँकेची सहा ते सात हजार कोटीपर्यंत उलाढाल होईल आणि बँक सक्षम होईल, या दृष्टीने आमचे प्रयत्न असल्याचे दळवी म्हणाले.
माजी अध्यक्ष राजन तेली म्हणाले, कोकणातील सिंधुदुर्ग बँक ही आज राज्यातील एक अग्रगण्य बँक म्हणून नवा रुपात आली आहे. भविष्यात ५ हजार कोटी वरून वाढ करण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न आहे. यातून जिल्हा बँक अधिक विकसित होऊन सहकारातून महिला शेतकरी आणि बेरोजगारांचा आर्थिक विकास साधूया.
यावेळी माजी विरोधी पक्षनेते मुंबई बँकेचे चेअरमन आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते मायक्रो एटीएम मोबाईल सिस्टीम सुविधा, सोशल मीडिया आदी नव्याने सुविधांचा शुभारंभ करण्यात आला. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी आभार मानले.