मालवण पोलीस निरीक्षकपदी प्रवीण कोल्हे यांची नियुक्ती
स्थानिक पातळी वरील समस्या सोडवण्याबरोबरच गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कटीबद्ध
नूतन पोलीस निरीक्षकांची ग्वाही ; जनतेला तक्रारी थेट मांडण्यासाठी खासगी मोबाईल नंबर केला जाहीर
मालवण : मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या सेवानिवृत्ती नंतर रिक्त होणाऱ्या पोलीस निरीक्षकपदी प्रवीण अशोक कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी पदभार स्वीकारला.
मालवण पोलीस ठाणे हद्दीत कायदा सुव्यवस्था राखली जाईल. स्थानिक पातळीवरील वाहतूक कोंडी व अन्य समस्या पोलीस व स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी, व्यापारी, नागरिक यांच्या सहकार्यातून सोडवल्या जातील. तसेच नागरिकांच्या तक्रारी, महिला छेडछाड, अन्य तक्रार तसेच कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याबाबत ही तक्रार नागरिकांनी थेट आपल्याकडे करावी, तक्रारीची दखल तात्काळ घेतली जाईल. यासाठी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी आपला मोबाईल क्रमांक ९७६७७००५०१ जनतेसाठी उपलब्ध करून दिला आहे. तर ११२ या टोल फ्री क्रमांकावर ही नागरिक तक्रार करू शकता. सर्वांच्या सहकार्याने कायदा व सुव्यवस्था राखली जाईल. असे त्यांनी सांगितले.
प्रवीण कोल्हे हे गेली १७ वर्षे पोलीस दलात अधिकारी पदावर सेवा बजावत आहेत. २००६-०७ या वर्षी पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून ते सेवेत रुजू झाले. २०१० पर्यत त्यांनी गडचिरोली येथे सेवा बजावली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) पदी रायगड व ठाणे ग्रामीण येथे आठ वर्षे ते कार्यरत होते. २०१९ या वर्षी पोलीस निरीक्षक म्हणून त्यांना प्रमोशन मिळाले. राज्य गुप्त वार्ता विभाग (एसआयडी) मुंबई याठिकाणी त्यांनी सेवा बजावली.