ठाकरे गटाकडून शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात मंजूर विकासकामांना स्वतःचे लेबल लावण्याचे प्रयत्न

भाजपाच्या विजय केनवडेकर यांचा आरोप ; हिंमत असेल तर जनतेच्या दरबारात आमने – सामने या, दूध का दूध पानी का पानी होईल…

मालवण | कुणाल मांजरेकर

वैभव नाईक हे आमदारकीच्या नऊ वर्षात सपशेल अपयशी ठरले आहेत. आजवर केवळ पत्रे देऊन विकासाच्या वलग्ना करण्याचे काम त्यांनी केले असून नुसती पत्रे देऊन विकास झाला असता तर कुडाळ मालवण मधील विकास कामे शिल्लक राहिली नसती. मागील दहा महिन्यात राज्यात भाजपा – शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांनी कोट्यावधीचा निधी या मतदार संघात आणला. मग महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार अशी सर्व पदे तुमच्याकडे असताना निधी का आला नाही ? असा सवाल भाजपाचे मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकास कामाना स्वतःचे लेबल लावून राजकारण करण्याचे काम ठाकरे गटाचे पदाधिकारी करीत आहेत. मात्र विकासकामांत राजकारण करण्याची गरज भाजपला नाही. जनतेचे आशीर्वाद हीच आमची संपत्ती आहे. म्हणूनच मागील दहा वर्ष केंद्रात आम्ही सत्तेत आहोत. हिंमत असेल तर ठाकरे गटाने विकास कामांच्या विषयात जनतेच्या दरबारात आमने सामने यावे, दूध का दूध आणि पानी का पानी करण्यास आम्ही तयार आहोत, असे आव्हान श्री. केनवडेकर यांनी दिले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजपवर केलेल्या टिकेचा श्री. केनवडेकर यांनी समाचार घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, आबा हडकर, ललित चव्हाण, प्रमोद करलकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केनवडेकर म्हणाले, वायरी भूतनाथ, तारकर्ली आणि देवबाग येथील विद्युत प्रश्नाबाबत झालेल्या घडामोडींवर भारतीय जनता पार्टी म्हणून येथील ग्रामस्थांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देण्यासाठी चार दिवसांपूर्वी आम्ही पत्रकार परिषद घेतली. मात्र आम्ही मांडलेल्या मुद्द्याला बगल देऊन ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांवर वैयक्तिक टीका टिपणी केली आहे. तोक्ते वादळात भाजपचे पदाधिकारी होते कुठे ? असा प्रश्न त्यांनी केला. त्यावेळी आम्ही जमिनीवर होतो, हवेत नव्हतो. विरोधक असतानाही आम्ही जनसेवेसाठी कार्यरत होतो. कुठल्याही भाजपा पदाधिकाऱ्यांनी खोटा पंचनामा करून स्वतःच्या कार्यकर्त्यांना मदत निधी देण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला नाही. तोक्ते वादळात मालवण शहर तीन दिवस अंधारात होते. त्यावेळी सत्ताधारी पक्ष वीज पुरवठा सुरळीत करण्यात असफल ठरल्याने नगरपालिकेच्या समोरील विद्युत पोल उभारून येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. या कामासाठी खासगी कर्मचारी तसेच मटेरियल उपलब्ध करून दिले. या उलट ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देवबाग गावात नुकसानग्रस्त एकाच घराचे तीन तीन पंचनामे करून प्रत्येकाला एक ते दीड लाख रुपयांची मदत मिळवून दिली. ही मदत स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला होती. स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने पैसे मिळवून देताना मदतीची खरोखरच ज्यांना आवश्यकता होती, अशांना मदतीपासून वंचित ठेवले गेले. अशा काही लोकांनी आमच्याकडे संपर्क साधल्यानंतर आमच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याचे काम आम्ही केले. भाजपा नेते निलेश राणे यांनी स्वतः पत्रे, कौले, ताडपत्री उपलब्ध करून नुकसानग्रस्तांना त्याचा लाभ मिळवून दिला. आम्ही केलेले काम लोकांनी पाहिले आहे. त्यामुळे तुम्हाला उत्तर देण्याची आम्हाला आवश्यकता नाही, असे श्री केनवडेकर म्हणाले.

तत्कालीन शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी भुयारी वीज वाहिनीचा निधी पळवला

मालवण बाजारपेठेतील भुयारी वीज वाहिनीचा प्रकल्प आम्ही व्यापारी पूर्ण करू शकलो नाही, असा आरोप हरी खोबरेकर यांनी केला आहे. मात्र मुळात त्यांनी हा प्रकल्प म्हणजे काय ते समजून घ्यावे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केंद्राच्या दिनदयाळ उपाध्याय योजनेतून हा प्रकल्प मंजूर करून आणला. जिल्ह्यासाठी २९८ किमी ची योजना आणण्यात आली. याचा खास करून मालवणला लाभ होणार होता. त्यावेळी तत्कालीन शिवसेनेचे पालकमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी मालवणचा साडे आठ कोटींचा निधी सावंतवाडीला वळवला. त्यावेळी हरी खोबरेकर होते कुठे ? आजपर्यंत सावंतवाडीतही सदरची योजना झालेली नाही. सुरेश प्रभू मालवणात आल्यावर त्यांनी अधिकारी वर्गाची झाडाझडती घेतली असता भाजपा नगरसेवक गणेश कुशे यांच्या प्रभागात भुयारी वीज वाहिनीचे काम करून घेतले. या कामाला तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही विरोध केला नाही. तसेच त्यावेळी सुदेश आचरेकर, दीपक पाटकर हे भाजपात नव्हते. तरीही जनहिताच्या कामाला त्यांनी पूर्णपणे सहकार्य केले. या योजनेच्या ट्रान्सफॉर्मरसाठी ४ फुट × ८ फुट जागा आवश्यक होती. बाजारपेठेत मोक्याच्या ठिकाणी एवढी जागा उपलब्ध होऊ शकते का ? असा सवाल विजय केनवडेकर यांनी केला.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!