भाजपा हा महासागर… त्याची तुलना करण्याचा प्रयत्न करू नका !

सुदेश आचरेकर यांचा हरी खोबरेकर यांना सल्ला ; तोक्ते वादळात तुम्ही वाटलेले साहित्य एकनाथ शिंदे यांच्याकडून आलेले

मालवण | कुणाल मांजरेकर

भारतीय जनता पक्ष हा महासागर आहे. महासागरात अनेक छोटी मोठी वादळे येत असतात. पण ती वादळे पेलवण्याची ताकद महासागरात असते. त्यामुळे भाजपातील लहान मोठ्या कुरबुरींची चिंता ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी करू नये. आम्ही सर्वजण पक्ष नेतृत्वाचे आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत. आमच्या घरात डोकावताना तुमच्या पक्षाचे अस्तित्व आधी तपासून पहा. ज्या पक्षाला नाव नाही, नेतृत्व नाही, दिशा नाही, ज्या पक्षाचे ४० – ४० आमदार एकाच वेळी फुटून जातात. तेव्हा त्या पक्षाचे नेतृत्व किती कमकुवत आहे ते सिद्ध कुठे, अशा शब्दात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी ठाकरे गटावर तोफ डागली आहे. तोक्ते वादळात आमदार वैभव नाईक यांनी मदत केल्याचे हरी खोबरेकर सांगतात. मात्र प्रत्यक्षात ती सर्व मदत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या खिशातून पाठवली होती. मात्र या मदतीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना न देता स्वतःच्या घर, हॉटेल, व्यवसायाला वापरून गोरगरीबांना मदतीपासून वंचित ठेवण्याचे काम ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची टीका श्री. आचरेकर यांनी केली.

भाजपच्या मालवण तालूका कार्यालयात ते बोलत होते. ते म्हणाले, ठाकरे गटाकडे आता नेतृत्व शिल्लक राहिलेले नाही. हरी खोबरेकर वगळता शहर, तालुक्यातील दुसरा नेता यांच्या पत्रकार परिषदेत दिसून येत नाही. त्यामुळे आपल्या पक्षाकडे किती पदाधिकारी शिल्लक आहेत, ते आधी तपासा. आणि नंतर भाजपा पदाधिकाऱ्यांवर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करा. तोक्ते वादळात आणि कोविड काळात भाजपचे पदाधिकारी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या मदतीसाठी कार्यरत होते. कोविड मध्ये अनेक रुग्णांना आम्ही औषधे उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. आम्ही केलेले काम जनतेला ज्ञात आहे. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी उभी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राणेसाहेब, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात आम्ही कार्यरत असून आमची चिंता ठाकरे गटाने करू नये. राणे साहेबांमुळेच चिवला बीच, दांडेश्वर मंदिराकडील बंधाऱ्याचे काम झाले. पण नऊ वर्षात आमदार वैभव नाईक सत्ताधारी पक्षात असूनही एकही इंच बंधारा करू शकले नाहीत. त्यामुळे भाजपने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न ठाकरे गटाने करू नये, असे सुदेश आचरेकर यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!