जिल्हा बँकेची तारकर्ली शाखा सुसज्ज जागेत स्थलांतरीत

बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत स्थलांतर सोहळा

मालवण शहरातील दोन शाखेचे एकत्रीकरण करण्याचा मानस : सतीश सावंत यांची माहिती

उमेद अंतर्गत महिला बचत गटांना जिल्हा बँकेशी जोडण्याबाबत प्रयत्न करण्याची ग्वाही

कुणाल मांजरेकर

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तारकर्ली येथील शाखा नवीन सुसज्ज अशा इमारतीत स्थलांतरित करण्यात आली आहे. या नूतन शाखेचा स्थलांतरण सोहळा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. तारकर्ली शाखेच्या जुन्या जागेत ग्राहकांना अनेक अडचणी भेडसावत असल्याने आता नवीन सुसज्ज इमारतीमध्ये तारकर्ली शाखेचा कारभार अधिक गतिमान पद्धतीने चालेल असा विश्वास यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी व्यक्त केला.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची तारकर्ली शाखा ही जुन्या जागेवरून तारकर्ली काळेथर येथील अजित गणपत भोगवेकर यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. या नूतन शाखा इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह संचालक व्हिक्टर डान्ट्स, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उप सहव्यवस्थापक डी. आर. लोकेगावकर, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, पं. स. सदस्या सौ.मधुरा चोपडेकर, सरपंच सौ. स्नेहा केरकर, काँग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, देवली सोसायटीचे चेअरमन श्यामसुंदर चव्हाण, संजय लुडबे, देवानंद चिंदरकर, मिलिंद झाड, बाबू बिरमोळे, आगोस्तीन डिसोझा, प्रफुल्ल मांजरेकर, मिथिलेश मिठबावकर, बँकेचे तालुका विकास अधिकारी विश्वनाथ डोर्लेकर, विकास अधिकारी सुरज गवंडी, संदीप मर्गज, तारकर्ली शाखा व्यवस्थापक दीपक चव्हाण, लिपिक केशव आचरेकर, माधव गोसावी, रवी मालवणकर, नितीन गोसावी, छाया फणसळकर, सुरेश वरक, संजय वीर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा बँकेच्या तारकर्ली शाखेच्या नव्या इमारतीत सुसज्ज अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या असून एटीएमची सुविधा देखील आहे. याबाबत बोलताना अध्यक्ष सतीश सावंत म्हणाले, तारकर्ली शाखेची जुनी जागा अपुरी पडत असल्याने तसेच ग्राहकांना रस्त्यावर रांगा लावाव्या लागत असल्याने नवीन जागेच्या शोधात आम्ही होतो. बँकेसाठी प्रशस्त अशी इमारत मिळाली असून याठिकाणी ग्राहकांना सुलभ व गतिमान पद्धतीने सेवा देणे शक्य होणार आहे, असे सांगितले. तसेच मालवण शहरात असलेल्या दोन शाखाही एकत्रित करून एकाच जागेत मालवण शाखा निर्माण करण्याचा आमचा विचार आहे, असेही सतीश सावंत यांनी सांगितले. यावेळी पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर यांनी तारकर्ली देवबाग गावातील बचत गटांना उमेद अंतर्गत निधी मिळविताना इतर बँकांकडून येणाऱ्या अडचणींबाबत लक्ष वेधले असता सतीश सावंत यांना उमेद अंतर्गत असणारे बचत गट जिल्हा बँकेशी जोडून सुलभ पद्धतीने त्यांना निधी मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगत अधिकाऱ्यांना त्याबाबत सूचना दिल्या.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!