… अन्यथा मालवण नगरपालिकेवर घागर कळशी आंदोलन करणार !

धामापूर नळपाणी योजनेतील अपुऱ्या पाणी पुरवठ्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेतर्फे धामापूर नळपाणी योजनेद्वारे शहरात होणारा पाणीपुरवठा सध्या विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा मालवण नगरपालिकेसमोर घागर कळशी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसतर्फे बुधवारी मालवण नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला.

मालवण शहरात नगरपालिकेतर्फे धामापूर नळपाणी योजनेद्वारे होणारा पाणी पुरवठा अनियमीत होत असून वीज पुरवठा खंडीत होणे व कमी दाबाचा वीज पुरवठा होणे यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याचे नगरपालिका प्रशासनाने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेत अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाणी पुरवठा सुरळीत होण्याबाबत चर्चा केली. तसेच नगरपालिकेच्या अधिकारी सोनाली हळदणकर यांना निवेदन सादर केले. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाडगावकर, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, काँग्रेस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळु अंधारी, देवानंद लूडबे, सरदार ताजर, लक्ष्मीकांत परुळेकर, कवटकर आदी व इतर उपस्थित होते.

धामापूर नळपाणी योजनेचा पाणी पुरवठा वीज खंडित झाल्यावर पूर्णपणे बंद होतो. त्यामुळे नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी जनरेटरचा वापर करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. जेणेकरुन यापुढे लाईट गेली हे कारण पुढे येणार नाही, असे सांगत अन्यथा युवक काँग्रेस तर्फे मालवण नगरपालिके समोर घागर कळशी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवक काँग्रेसतर्फे निवेदनातून देण्यात आला आहे. पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असून येत्या तीन -चार दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन यावेळी अधिकारी सोनाली हळदणकर यांनी दिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!