वादळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात
शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची तहसीलदारांकडे मागणी
मालवण : हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ५ ते ७ जून या कालावधीत किनारपट्टी भागात वादळसदृश परिस्थिती निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना द्याव्यात अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
हवामान खात्याने ५ ते ७ जून या काळात वादळ होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे शहरासह देवबाग, तारकर्ली, वायरी, तोंडवळी-तळाशील, सर्जेकोट, आचरा या किनारपट्टी गावात बैठका घेत आपल्या विभागामार्फत सुरक्षा यंत्रणा तैनात कराव्यात. वादळसदृश परिस्थितीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी, वित्तहानी होऊ नये यासाठी संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी श्री. खोबरेकर यांनी तहसिलदारांकडे केली आहे.