कुंभारमाठ प्रीमिअर लीगमध्ये जय गणेश देवली संघ ठरला विजेतेपदाचा मानकरी

प्रीतम इलेव्हनला उपविजेतेपद ; माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण

मालवण : कुंभारमाठ ग्रामस्थ, कुंभार समाजाने आयोजित केलेल्या “कुंभारमाठ प्रीमिअर लीग (KPL 2023) या क्रिकेट स्पर्धेत जय गणेश देवली संघाने प्रीतम इलेव्हन संघाचा अंतिम सामान्यातील रोमहर्षक लढतीत पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. स्पर्धेतील विजेत्यांना माजी जि. प. अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. विजेत्या संघाला ३५ हजार रुपये आणि चषक तर उप विजेत्या संघाला २५ हजार रुपये आणि चषक देण्यात आला.

कुंभारमाठ येथील मैदानावर नुकतीच ही स्पर्धा घेण्यात आली. अशोक सावंत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. स्पर्धेत १२ संघानी सहभाग घेतला. पहिला उपांत्य फेरीचा सामना जय गणेश देवली विरुद्ध अथांग स्पोर्ट्स कुंभारमाठ यांच्यात झाला. त्यात देवली संघाने विजेतेपद मिळवित अंतिम सामन्यात प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रीतम इलेव्हन संघाने ओंकार चौके संघाचा पराभव करीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामनात देवली संघाने प्रथम फलंदाजी करताना ५५ धावा करीत प्रीतम इलेव्हन संघाला विजयासाठी ५६ धावांचे लक्ष्य दिले. मात्र शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात प्रीतम इलेव्हन संघ ५० धावाच जमवू शकला. त्यामुळे देवली संघाने या सामन्यात ५ धावांनी विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. उपांत्य फेरीतील पराभूत तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्राप्त संघाना आकर्षक चषक देण्यात आला.

या स्पर्धेत तुषार वाटेगावकर हा मालिकावीर ठरला. त्याला १२ हजार किमतीची वॉशिंग मशीन आणि चषक देण्यात आला. तर उत्कृष्ट फलंदाज आकाश सांगवेकर, गोलंदाज हरेश डिचवलकर, यष्टीरक्षक राजू चव्हाण आणि क्षेत्ररक्षक ऍंथोनी फर्नांडिस यांना फॅन टॉवर आणि चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील षटकार किंग आकाश सांगवेकर तर चौकार किंग ओंकार देऊलकर यांना १ हजार आणि चषक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब यांनी स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यावेळी कुंभारमाठ सरपंच सौ. पूनम वाटेगावकर, कुंभारमाठ ग्रामस्थ कुंभार समाज मुंबई मंडळ अध्यक्ष विजय वाटेगावकर, संतोष गुडेकर, प्रशांत सडविलकर, दिलीप सांगवेकर, विनोद भोगावकर, माजी सरपंच प्रमोद भोगावकर यांसह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी समालोचक म्ह्णून बादल चौधरी, कृष्णा देवजी, प्रदीप देऊलकर, श्याम वाक्कर, सागर कदम तर पंच म्हणून दीपक धुरी, उमेश मांजरेकर आणि आंब्रोज आल्मेडा, गुणलेखक गणेश राऊळ यांनी काम पाहिले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3836

Leave a Reply

error: Content is protected !!