“विनायक राऊत हा तर चिल्लरपणा”… ; “त्या” भेटीवरून निलेश राणे यांनी घेतला समाचार

मालवण | कुणाल मांजरेकर

कोकण रेल्वे मधील तिकिटांचा कथित काळाबाजार आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात ज्यादा रेल्वे गाड्या सोडण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेतली. या भेटीचा भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. कोकण रेल्वे ही केवळ ऑपरेटर आहे. मध्य रेल्वेकडून सोडण्यात येणाऱ्या गाड्या ऑपरेट करण्याचे अधिकार कोकण रेल्वेकडे आहेत. ज्यादा गाड्या सोडण्याचे कोणतेही अधिकार कोकण रेल्वेला नाहीत. एकतर विनायक राऊत हा स्वतः मूर्ख माणूस आहे किंवा तो कोकणी जनतेला मूर्ख समजतो. म्हणूनच कोकण रेल्वेच्या कक्षेबाहेरील विषय घेऊन खा. राऊत यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. आपण काहीतरी करतोय हे भासवण्यासाठी त्यांनी या भेटीची नौटंकी केली. हा सरळ सरळ चिल्लरपणा आहे. आमचं दुर्भाग्य आहे, असा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून निवडून गेला. नऊ वर्षात या माणसाने कोकणची वाट लावली. कोकण रेल्वेकडे जे मागायचं ते याने नऊ वर्षात मागितलं असतं. तर आम्हालाही आनंद वाटला असता, अशा शब्दात निलेश राणे यांनी खा. राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना कोकण रेल्वे तिकीट आरक्षित करताना जो त्रास झाला, त्या अनुषंगाने विचारणा करणे, दलालांना पायबंद करणे आणि अधिकाधिक रेल्वे गणेशोत्सवाच्या दरम्यान सोडणे या विषयाच्या अनुषंगाने खा. विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांसोबत गुरुवारी कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीचा निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. मुळात हे दोन्ही विषय कोकण रेल्वेकडे येत नाहीत. विनायक राऊत हा मूर्ख माणूस आहे किंवा तो जनतेला मूर्ख समजतो. जे विषय कोकण रेल्वेकडे येत नाहीत ते विषय घेऊन तो कोकण रेल्वेकडे गेला.

… तर विनायक राऊत यांचा आम्ही सत्कार करू !

तिकिटामध्ये जर काळाबाजार होत असेल तर अमुक अमुक एजन्सी अथवा अमुक अमुक व्यक्ती काळाबाजार करते, याचा पुरावा त्यांनी दिला पाहिजे. नेमका काळा बाजार कुठून चालतो हे विनायक राऊत यांनी सांगावं. आम्ही त्यांचा सत्कार करू. विनायक राऊत यांनी कायतरी चांगलं काम केलं, हे आम्हाला सांगायला मिळेल. मात्र असा काही पुरावा त्यांनी दिलेला नाही. नुसता काळा बाजार होतो बोलण्यापेक्षा तो कुठे होतो ते सांगा. असं निलेश राणे म्हणाले.

कुठलंही सरकार असू देत गणेशोत्सवासाठी जास्त गाड्या मिळतातच

गणेशोत्सवा साठी जादा गाड्यांची मागणी घेऊन विनायक राऊत कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना भेटले. मात्र कुठलंही सरकार असू देत गणेशोत्सवासाठी जास्त गाड्या मिळतातच. कोकण रेल्वे फक्त ऑपरेटर आहे. गाड्या मिळतात मध्य रेल्वेकडून. मध्य रेल्वे जोपर्यंत गाड्या वाढवत नाही, तोपर्यंत गाड्या चालवण्याचा अधिकार कोकण रेल्वेला नाही. हे समजण्याची अक्कल विनायक राऊतकडे नाही. फक्त लोकांना दाखवायचं मी कायतरी करतो, त्या पलीकडे या माणसाकडून काही होणार नाही. नऊ वर्ष या माणसाने वाट लावली. कोकण रेल्वेकडे जे मागायचं ते मागितलं असतं तर आम्हाला आनंद वाटला असता, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!