किल्ले प्रवासी होडी वाहतूक, जलक्रीडा व्यवसायांना मुदतवाढ द्यावी…

शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांची मेरिटाईम बोर्डाकडे मागणी

मालवण | कुणाल मांजरेकर

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या निर्देशानुसार पर्यटन हंगामाची २५ मे पासून अधिकृत सांगता होत आहे. त्यामुळे किल्ले प्रवासी होडी वाहतूक आणि जलक्रीडा व्यवसाय २६ मे पासून बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर अद्याप समुद्रात कोणतेही बदल झाले नसून समुद्रातील वातावरणाचा अंदाज घेत पर्यटन व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मेरिटाईम बोर्डाने काही दिवसांसाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी केली आहे.

सप्टेंबर पासून सुरू झालेल्या पर्यटन हंगामाची २५ मे रोजी सांगता होत आहे. या हंगामाच्या सुरवातीपासून वादळसदृश परिस्थिती तसेच अन्य कारणांमुळे जलक्रीडा, किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवा बंद ठेवावी लागली. प्रत्यक्षात हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात पर्यटकांचा ओघ हा जास्त असतो. पुढील पावसाळी हंगामाची चांगली बेगमी याच दिवसात व्यावसायिकांना मिळते. मेरिटाईम बोर्डाने २६ मे पासून जलक्रीडा, किल्ले प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. सद्यस्थितीत समुद्रातील वातावरण अद्यापही चांगले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून जलक्रीडा व किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवेसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी श्री. खोबरेकर यांनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!