बुधवळे – कुडोपी सरपंचांचा “यु टर्न”, भाजपा प्रवेशाचा “इन्कार” !
खा. विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांची कणकवलीत घेतली भेट
मी वैभव नाईक यांच्या सोबतच ; कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणारही नाही ; पानवलकर यांची प्रतिक्रिया
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री भाजपात प्रवेश करणाऱ्या बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांनी “यु टर्न” घेतला आहे. आपण शिवसेना ठाकरे गटातच असून आपल्याला कोणतीही कल्पना न देता एका कार्यक्रमाला बोलावून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे भाजप कडून जाहीर करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याबाबत ठाकरे गटाकडून माहिती देण्यात आली आहे. “आपण आ. वैभव नाईक यांच्या सोबतच आहे, आणि यापुढेही त्यांच्या सोबतच राहणार, कुठल्याही पक्षात मी प्रवेश केलेला नाही आणि करणारही नाही” अशी प्रतिक्रिया श्री. पानवलकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे.
बुधवळे सरपंच संतोष पानवलकर यांनी सोमवारी रात्री आचरा येथे भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. मात्र आज त्यांनी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली. आपण कायम आ. वैभव नाईक आणि शिवसेनेसोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. मला सर्वसामान्य शिवसैनिकांनी व ग्रामस्थांनी निवडून दिले आहे याची मला पूर्णतः जाण आहे. त्यामुळे आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही अथवा करणार नाही असेही श्री. पानवलकर यांनी म्हटल्याचे ठाकरे गटाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
यावेळी खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांनी संतोष पानवलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. भाजपकडून सरपंचाची फसवणूक करण्याचे प्रकार सुरु आहेत. इतर सरपंचांनी देखील सतर्क राहण्याच्या सूचना यावेळी केल्या. यावेळी विभाग संघटक संतोष घाडी, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सावंत, शाखाप्रमुख अभिमन्यू येरम, ग्रा.प.सदस्य राजू घागरे आदी उपस्थित होते.