निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपचा आचरा विभागात ठाकरे गटाला धक्का ….

शिवउद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश गावकर, बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये प्रवेश

नऊ वर्षे ओसाड पडलेल्या कुडाळ – मालवण मतदार संघाला गतवैभव प्राप्त करून देणार ; निलेश राणेंची ग्वाही

बुधवळे कुडोपीसह चिंदर, हडी येथीलही ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

मालवण | कुणाल मांजरेकर

माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने आचरा विभागात शिवसेना ठाकरे गटाला मोठा हादरा दिला आहे. माजी नगरसेवक मंदार केणी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवउद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष मंगेश गावकर यांच्यासह बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह सोमवारी रात्री निलेश राणे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन भाजपामध्ये प्रवेश केला. आपण कोणत्याही अटीविना हा प्रवेश करीत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी स्पष्ट केले. मात्र ज्या विश्वासाने तुम्ही भाजपात दाखल झाला आहात, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. विभागातील प्रश्नांची यादी माझ्याकडे द्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. राज्यात ओळख असलेला कुडाळ मालवण मतदार संघ मागील नऊ वर्षे विकास कामांअभावी ओसाड पडला आहे. ह्या मतदार संघाला गतवैभव मिळवून देण्याची ग्वाही निलेश राणे यांनी यावेळी दिली. यावेळी बुधवळे कुडोपी सह चिंदर, हडी येथीलही ठाकरे गटाच्या लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

आचरा येथील निलेश सरजोशी यांच्या हॉलवर भाजपा नेते निलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, जेरॉन फर्नांडिस, विभागीय अध्यक्ष संतोष कोदे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, महेश मांजरेकर, जगदीश पांगे यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शिवउद्योग आघाडीचे तालुकाप्रमुख मंगेश गांवकर, बुधवळे कुडोपी सरपंच संतोष पानवलकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते तसेच चिंदर ग्रा. पं. सदस्य जान्हवी घाडी, निलेश रेवडेकर, स्वरा पालकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते आणि हडी ग्रा. पं. सदस्य ऋषिकेश आस्वलकर व अन्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे निलेश राणे यांनी पक्षात स्वागत केले.

यावेळी निलेश राणे म्हणाले, कुडाळ मालवण तालुक्यात काम करताना नऊ वर्षात अनेक गोष्टी जाणवत होत्या. विकास कामेच होत नसल्याबाबत अनेक तक्रारी येत होत्या. नऊ वर्षे या मतदार संघाला वाली नव्हता. हा मतदार संघ ओसाड पडला होता. राणेसाहेब इथले आमदार असताना निधी मागावा लागत नव्हता. मालवण म्हटलं की अधिकारी स्वतःहून निधी देत होते. एवढा राणेसाहेबांच्या नावाचा दरारा होता. पण मालवणचे हे नाव आता मंत्रालयात ओस पडले आहे. इथल्या आमदाराची कुवत स्वतः उद्धव ठाकरे यांनी ओळखून याला एकदाही मंत्री केले नाही. कुडाळ मालवणात राणे साहेबांचा पराभव झाला हे सगळ्यांना समजले. पण कोण निवडून आले, ते कोणालाही माहित नाही. मंत्रालयाच्या गेटवरचा वॉचमन देखील इथल्या आमदाराला ओळखत नाही, सुप्रिया सुळे यांना सांगावे लागते, हा आमदार आहे. अशी राजकीय परिस्थिती आज बनली आहे. राज्यात नऊ दहा महिन्यांपूर्वी भाजपा शिवसेनेचे सरकार सत्तेवर आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्यासारखे पालकमंत्री आपल्याला भेटले आहेत. कुडाळ मालवण मतदार संघाचा नऊ वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मी त्यांच्याकडे निधी मागितला. त्यांनीही भरभरून आपल्याला दिल आहे. आज या दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरु आहेत. एका वर्षात तब्बल ९० कोटींचा निधी प्रथमच आपल्याकडे आला. मागील आठ वर्ष ओरोस येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला निधी मिळाला नव्हता. पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधी नसेल तर एफडी ची रक्कम तोडा पण पुतळा झाला पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे आता हे काम सुरु झाले आहे. कोल्हापूर मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आकार घेत आहे. माणूस पदाला न्याय देणारा असेल तर कामे होतातच हे पालकमंत्र्यांनी दाखवून दिले आहे. आज २५० कोटीच्यावर जिल्हा नियोजनचा निधी जाणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने आज जिल्ह्याला २५/ १५ चा मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. त्यामुळे याठिकाणी विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. तुम्ही ज्या विश्वासाने प्रवेश केला, त्याला तडा जाऊ देणार नाही. तुम्ही द्याल ती कामे मंजूर करुन आणायची जबाबदारी माझी आहे. आता देणारे हात मला मिळाले आहेत. स्वतः पालकमंत्र्यांनी गावागावात जाऊन विकास कामाची यादी तयार करण्याची सुचना मला केली आहे. आज मी दिलेली ९० /% कामे त्यांनी मार्गी लावली आहेत. जिल्ह्यातील अन्य मतदार संघापेक्षा मालवण कुडाळ मतदार संघाला ते प्राधान्य देत आहेत, असे निलेश राणे म्हणाले.

मरेपर्यंत साथ सोडणार नाही ; निलेश राणेंचा शब्द

ज्या मतदार संघातून आमच्या साहेबांचा पराभव झाला, त्या मतदार संघात आपल्यातील कोणतरी आमदार झाला पाहिजे. या मतदार संघाला जी किड लागली आहे, ती २०२४ मध्ये आपल्याला घालवायची आहे. त्यासाठी कामाला लावा. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी तुम्ही जोर लावा. वाटेल ती यंत्रणा तुम्हाला देऊ. आवश्यकती सर्व रसद पुरवू. तुम्ही आमचा मानसन्मान राखला. तुमची साथ मरेपर्यंत सोडणार नाही, अशी ग्वाही निलेश राणे यांनी दिली.

आमदाराच्या पत्रांचे गावागावात ढीग…

येथील आमदाराने जनतेची दिशाभूल करण्यासाठी गावागावात विकास कामांची पत्रे दिली. आज गावागावात या पत्रांचे ढीग झाले आहेत. त्या ढिगाना आता त्याच्याकडे उत्तर नाही. म्हणूनच मालवण बरोबरच कुडाळ मध्ये मोठे प्रवेश भाजपात होत आहेत. मटणाचा वास आला की याची गाडी त्या गावात वळते. पण कधी खिशात हात जात नाही. मागील नऊ वर्षात या मतदार संघात एक प्रकल्प नाही, योजना नाही, पैसा नाही आणला. फक्त विकास कामाना विरोध करण्याचे काम याने केले, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!