मालवण शहरातील न. प. च्या मालकीचे गाळे लिलावा अभावी पडून ; पालिकेचे लाखोंचे नुकसान
मुख्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : जबाबदार अधिकाऱ्यांकडून नुकसानीचे पैसे वसूल करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार : महेश कांदळगावकर
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण नगरपालिकेच्या मालकीच्या फिश मार्केट, मामा वरेरकर नाट्यगृह आणि ग्रामीण रुग्णालया नजिकच्या इमारती मधील तयार गाळे लिलाव न झाल्याने पडून आहेत. या गाळ्यांसाठी भाडेकरू इच्छूक असतानाही प्रशासन भाडे निश्चित करण्यासाठी विलंब करीत असल्याने पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत मुख्याधिकाऱ्यांना कळवूनही त्यांच्याकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेच्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांकडून हे पैसे वसूल करण्यासाठी शासनाकडे मागणी करणार असल्याची माहिती श्री. कांदळगावकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
मालवण नगर परिषद मच्छिमार्केटच्या वरील मजल्यावर भाड्याने गाळे बांधण्यात आलेले आहेत. आमच्या कालावधीमध्ये याठिकाणी लाईट व्यवस्थे बाबत जे काम अपुरे होते ते पूर्ण करून गाळे वापरासाठी योग्य स्थितीत करून ठेवण्यात आले होते. या गाळ्यांच्या लिलावासाठी नगररचना ऑफिस कडून भाडे ठरवून घेणे बाबत प्रशासनाला वारंवार कळवूनही जवळपास दोन वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला असताना अद्यापपर्यत या बाबत कुठलीही कार्यवाही करण्यात आलेले नाही. यामुळे नगर परिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे प्राधान्याने विशेषतः मच्छिमार बांधवाना अभिप्रेत धरून, त्यांना या ठिकाणी आपल्या व्यवसायाच्या ऑफिस, त्यांच्या मच्छिमार सोसायटीच्या ऑफिस , मासेमारीच्या अवजारांची दुकाने यासाठी व अन्य व्यावसायिकांसाठी भाड्याने गाळे उपलब्ध होण्याचे दृष्टीने हे गाळे बांधण्यात आले होते. तो उद्देशही असफल झाला आहे. आज अनेक जणांची भाड्याने जागेची मागणी असताना अश्या मोक्याच्या ठिकाणी असणारे गाळे बंद अवस्थेत आहेत.
नगरपरिषद मामा वरेरकर नाट्यगृह आणि ग्रामीण रुग्णालय नजिक असलेले गाळेही लिलाव न झाल्याने बंद आहेत. मालवण सारख्या पर्यटन शहर म्हणून विकसित होत असलेल्या शहरात भाड्याने जागांची मागणी असताना वारंवार कळवूनही या बाबत मुख्य अधिकारी यांच्या कडून अक्षम्य दुर्लक्ष झाला आहे. त्यामूळे या मिळणाऱ्या उत्पन्ना पासून नगर परिषदेस झालेल्या नुकसानीला जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांच्या कडून हे पैसे वसूल करण्याबाबत आणि कारवाई करण्याबाबत शासनाला कळविणार आहे, असे श्री. कांदळगावकर यांनी म्हटले आहे.