मालवणात एसटी कर्मचाऱ्यांनी उगारले काम बंद आंदोलनाचे हत्यार ; प्रवासी बस स्थानकावर ताटकळत
लिपिकाच्या निलंबनामुळे अन्य कर्मचारी आक्रमक ; एक ते दीड तासानंतर विभाग नियंत्रकांच्या मध्यस्थी नंतर आंदोलन मागे
मालवण | कुणाल मांजरेकर
कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी आगारप्रमुखांनी आगारातील लिपिक टंकलेखकाचे निलंबन केल्याने अन्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत काम बंद आंदोलन पुकारत बस फेऱ्या चालवण्यास नकार दिल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास मालवणात घडला. यामुळे मुंबईला रेल्वेने जाण्यासाठी बस स्थानकावर आलेल्या प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. यामुळे दीड तास बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. अखेर विभाग नियंत्रकांनी यामध्ये हस्तक्षेप करीत प्रवासी वर्गाची गैरसोय होवू नये यासाठी एसटी फेऱ्या सुरू करण्याची सूचना कर्मचाऱ्यांना केली. संबंधित कर्मचाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत उद्या चर्चा करू असे आश्वासन दिल्याने सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्या नंतर बसफेऱ्या पूर्ववत सुरु करण्यात आल्या. या प्रकारामुळे प्रवासी वर्गाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी प्रमुख अधिकारी उपस्थित नसल्याने स्थानक प्रमुखांना प्रवाशांच्या नाराजीला सामोरे जावे लागले होते.
मालवण एसटी आगारातील एका कर्मचाऱ्याला आगारातील प्रमुख अधिकारी यांच्या आदेशाने निलंबीत करण्यात आले होते. ही कारवाई आज सायंकाळी करण्यात आली. या आदेशाची प्रत एसटी डेपोच्या एका भिंतीवर लावण्यात आली होती. ही नोटीस वाचल्यानंतर कर्मचारी वर्ग आक्रमक बनला. त्यांनी सायंकाळनंतर एकत्रित येत एसटी फेऱ्यांवर न जाण्याचा निर्णय घेत जोपर्यंत निलंबन कारवाई मागे घेण्यात येत नाही आणि सक्षम अधिकारी चर्चेसाठी येत नाही तोपर्यंत बसस्थानकावर थांबून राहण्याचा निर्णय घेतला. स्थानक प्रमुखांनी कर्मचाऱ्यांशी चर्चा केली, मात्र कर्मचारी यांनी आपली भूमीका स्पष्ट करत प्रमुख अधिकाऱ्यांनी चर्चेला यावे असे सांगितले. मात्र एक तास होत आला तरी कोणतीही चर्चा न झाल्याने कर्मचारी अधिकच आक्रमक बनले होते.
मुंबईला रेल्वेने जाण्यासाठी कुडाळ व कणकवली याठिकाणी जाण्यासाठी मालवण बसस्थानकावर प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने आलेला होता. बहुतांशी प्रवासी वर्ग हा मुंबईकर चाकरमानी होता. रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या गाड्याच थांबल्याने प्रवासी वर्ग अधिकच आक्रमक बनला होता. काही प्रवाशांनी तर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत स्थानकप्रमुखांनाही खडे बोल सुनावले. तसेच आंदोलनात्माक पवित्रा घेण्यात येईल असा इशारा दिला.इ