राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नौदल अधिकाऱ्यांकडून मालवणात आढावा
किल्ले सिंधुदुर्गला दिली भेट ; किल्ल्याच्या बाहेर तात्पुरत्या स्वरूपात तरंगती जेटी उभारण्याच्या दृष्टीने चाचपणी
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवणच्या समुद्रातील किल्ले सिंधुदुर्गवर डिसेंबर महिन्यात भारतीय नौदल दिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती दौपदी मुर्मु उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नौदलाच्या पथकाने गुरुवारी मालवण बंदर जेटी आणि सिंधुदुर्ग किल्ल्याची पाहणी केली.
यात नौदलाचे काही अधिकारी सामील होते. या पथकाने किल्ला आणि परिसराची पाहणी करताना बंदर जेटी परिसरातील वॉटर स्पोर्टस् आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्याचा सूचना केल्याचे पर्यटन व्यावसायिक दामू तोडणकर यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवण सिंधुदुर्ग किल्ला आणि परिसरात नौदल अधिकारी आणि उच्चस्तरीय सुरक्षा अधिकारी यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. या अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून समुद्रातील खडकाळ जागा, व अन्य अडथळा ठरू शकणाऱ्या बाबींचा आढावा घेतला जात आहे. किल्ल्यावर उतरण्याची व्यवस्था याची पाहणी केल्याचे सांगण्यात आले. त्याच बरोबर किल्याच्या प्रवेशद्वारा जवळ समुद्रात तात्पुरत्या तरंगती जेटीची चाचणी सुरू असल्याचे काहींनी सांगितले.
अधिकाऱ्यांचे हे पथक सकाळी चिपी विमानतळावर उतरल्यानंतर त्यांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या आरमार या बोटीने कोरजाई वेंगुर्ला येथून तारकर्ली एमटीडीसी येथे त्यांना आणण्यात आले. तारकर्ली एमटीडीसी येथे नौदलाच्या अधिकाऱ्यांची जिल्हा प्रशासनातील महत्त्वाचे विभाग आणि अधिकाऱ्यांशी बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांसह महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड सार्वजनिक बांधकाम विभाग, मत्स्य विभाग, पर्यटन विभाग यांसह अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर या पथकाने सिंधुदुर्ग किल्ला जेटी परिसराची पाहणी केली.