मसुरे रमाई नदीतील गाळ उपशाचे काम निधी अभावी रखडणार नाही ; निलेश राणेंचा ग्रामस्थांना शब्द
डिझेल साठीचा आवश्यक निधी उद्याच उपलब्ध करून देण्याचीही ग्वाही
सरकार आमचं, प्रशासन आमचं, कोणतरी खोटं बोलून दिशाभूल करील, त्याच्या मागे फरफटत जाऊ नका ; ग्रामस्थांना आवाहन
मालवण | कुणाल मांजरेकर
भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी बुधवारी मसुरे गावाला भेट देऊन रमाई नदीपात्राची पाहणी केली. डिझेलच्या निधी अभावी येथील गाळ उपशाचे काम आठ दिवस बंद आहे, हे काम तात्काळ सुरु करण्याची ग्वाही देतानाच डिझेल साठीचा सहा कोटींचा निधी उद्या तात्काळ अदा केला जाईल. निधी अभावी येथील कुठलेच काम रखडणार नाही, असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले. राज्यात शिवसेना – भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे सरकार आमचं आणि प्रशासन देखील आमचंच आहे. उद्या कोणतरी इथे येऊन तुमची दिशाभूल करील. त्याच्यामागे फरफटत जाऊ नका, भाजपच्या माध्यमातून तुमची कामे होत आहेत. त्याचा रिझल्ट देखील गावातून दाखवून द्या, असे आवाहन निलेश राणे यांनी यावेळी केले.
मसुरे गावातून वाहणाऱ्या रमाई नदी मधील गाळ उपशाचे काम डिझेल साठी निधी नसल्याने गेले आठ दिवस बंद होते. याबाबत माजी जि.प. अध्यक्ष सौ. सरोज परब, माजी पं. स. सदस्य महेश बागवे यांनी भाजपा नेते निलेश राणे यांचे लक्ष वेधले होते. याची तातडीने दखल घेत त्यांनी मसुरे देऊळवाडा येथे भेट देत ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी देऊळवाडा प्राथमिक शाळा येथे बोलताना निलेश राणे म्हणाले, मसुरे गाव हा केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब यांचा आवडता गाव आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे विकास कामाना निधी कमी पडणार नाही. परंतु विकास कामे आम्ही करणार आणि श्रेय दुसऱ्यांना घेऊ देऊ नका. इथले नाव घेण्या इतके मोठे नसलेले पुढारी तुमची कामे करून देतो म्हणून सांगतील पण त्यांच्या कडून ते होणार नाही. या भागातील प्रलंबित विकासकामे पूर्ण होण्यासाठी भाजपच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे ते म्हणाले.
यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, देऊळवाडा सरपंच नरेंद्र सावंत, माजी जि. प. अध्यक्ष सौ. सरोज परब, माजी पं. स. सदस्य महेश बागवे, विलास मेस्त्री, शिवाजी परब, सौ. अभ्यंकर, अशोक मसुरकर, बागायत माजी सरपंच निलेश खोत, यासिन सैय्यद, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मसुरे मार्गाचीतड येथे रमाई नदी मधील गाळ उपसा केलेल्या ठिकाणी निलेश राणे यांनी भेट देत पाहणी केली.
पन्हळकर टेंबवाडीत तीव्र पाणी टंचाई ; निलेश राणेंकडून तात्काळ दखल
देऊळवाडा पन्हळकर टेंबवाडी या भागात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून ग्रामस्थांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. याबाबत येथील महिलांनी उपाययोजना करण्या बाबत निलेश राणे यांच्याकडे मागणी केली. यावेळी निलेश राणे यांनी तात्काळ लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधून अधिकारी वर्गाला ग्रामस्थांची उद्या भेट घेऊन पाणी टंचाई दूर होण्यासाठी काम करण्याचे आदेश दिले. यावेळी देऊळवाडा बौद्धवाडी स्मशानभूमी, तसेच रस्त्यांच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने महेश बागवे यांनी दिले.
तोपर्यंत धरणाच्या कामास प्रारंभ नको!
मसुरे देऊळवाडा येथे धरणाचे काम मंजूर असून संबंधित शेतकऱ्यांना किती आर्थिक मोबदला जमिनीचा मिळणार आहे, याबाबत काहीच माहिती नाही आहे. त्यामुळे मोबदल्याची पूर्ण रक्कम मिळाल्या शिवाय धरणाच्या कामास सुरवात करू नये अशी मागणी यावेळी जमीनदार शेतकऱ्यांनी केली. तसेच ठेकेदार दादागिरी करून जमीन मालकांना धमकावत असल्या बाबत सुद्धा माहिती दिली.